Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक कधी पूर्ण होणार? अशी राहणार त्याची वैशिष्ट्ये

indu mill
, मंगळवार, 6 डिसेंबर 2022 (14:08 IST)
मुंबई – येथील इंदू मिल मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकातील भव्य पुतळ्याचे काम गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील राम सुतार आर्ट कंपनीमध्ये सुरू आहे. स्मारकात बाबासाहेबांचा ३५० फुट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. जगविख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हा पुतळा उभारणार आहेत.
 
गाझियाबाद येथे या पुतळ्याची २५ फुटाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीच्या आधारावरच मूळ पुतळा उभारण्यात येत आहे. इंदू मिल येथील नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुधारित संकल्पनेस जानेवारी २०२० मध्ये राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यानुसार स्मारकातील पुतळयाची उंची वाढवून ३५० फूट करण्यात आली आहे. पुतळा उभारण्यासाठी चवथरा निर्माणाचे कार्य सुरु असून त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे.मार्च २०२४ पर्यंत स्मारक पूर्ण करण्याचे राज्य शासनाने उद्दीष्ट आहे.
 
बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने ११०० कोटींच्या सुधारीत निधीस मंजुरी दिली आहे. राज्य शासनाने मार्च २०२२ अखेर २२८ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात स्मारकासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात या स्मारकासाठी ३०० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक व बाबासाहेबांचा पुतळा या स्मारकाचे खास वैशिष्ट्य आहे. देश- विदेशातील बाबासाहेबांचे अनुयायी या स्मारकाला भेट देवून त्यांच्या भव्य पुतळयापासून प्रेरणा घेतील, असा विश्वास आहे.
 
स्मारकाची वैशिष्ट्ये
४.८ हेक्टर क्षेत्रफळ जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक साकारत असून या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १०९० कोटी रुपये आहे. प्रकल्पाचे प्रवेशद्वार, इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, बेसमेंटमधील वाहनतळाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावलौकिकाला साजेसे स्मारक इंदू मिलच्या परिसरात उभारले जात असून त्यांचे स्थापत्य काम प्रगतीपथावर आहे.
या स्मारकात डॉ. आंबेडकर यांचा भव्य पुतळा त्याशिवाय सुसज्ज वाचनालय, पार्किंग, बसण्याची व्यवस्था, मोठे सुसज्ज सभागृह तयार करण्यात येणार आहे.
 
स्मारकाविषयी….
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील पुतळ्याची उंची- पादपीठ ३० मीटर (१००फूट) उंच व पुतळा १०६.६८ मीटर ( ३५० फूट) उंच अशी एकूण १३६.३८ मीटर ( ४५० फूट) उंची असेल
– प्रवेशद्वार इमारतीमध्ये माहिती केंद्र, तिकीट घर, लॉकर रूम, प्रसाधनगृह, सुरक्षा काऊंटर, स्मरणिका कक्ष, उपहारगृह व नियंत्रण कक्ष इत्यादी बाबींचा अंतर्भाव असेल.
– स्मारकाचे काम एकूण क्षेत्रफळ ४.८ हेक्टरजागेत सुरू असून बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ – ४६३८८ चौ.मी. आहे. तर हरित जागेचे क्षेत्र ६८ टक्के आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाळासाहेबांचा प्रस्ताव अन् 'शिव-भीम'शक्तीचा उगम; रामदास आठवलेंनी सांगितली ११ वर्षांपूर्वीची आठवण