राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अनेक कामे सुरू झाली आहेत. याचा फायदा घेत आणि आपल्या गावी भुकेकंगाल होण्यापेक्षा परप्रांतीय मजुरांनी पुन्हा रेल्वेच्या माध्यमातून मुंबईची वाट धरली आहे. आतापर्यंत सुमारे पाच लाख मजूर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात परतले असून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात सुद्धा केली आहे.
लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागांत अडकलेल्या मजुरांच्या घरवापसीसाठी रेल्वेतर्फे श्रमिक ट्रेन चालविण्यात आल्या होत्या. तर १२ मे पासून राजधानी स्पेशल ट्रेन धावत आहेत, १ जूनपासून सामान्य नागरिकांसाठी निवडक मार्गावर २०० ट्रेन सुरू करण्यात आलेल्या आहेत. सर्वाधिक ट्रेन या मुंबईत येणार्या आहेत. जून महिन्यात मुंबईच्या रेल्वे स्थानकावर दररोज १५ ते २० हजार परप्रांतीय मजूर दाखल होत आहेत. १ जूनपासून ते २५ जूनपर्यंत आतापर्यंत मुंबईत ४ लाख ८१ हजार ९८३ परप्रांतीय मजूर मुंबईत परतले आहेत. मुंबईत रेल्वेची पाच प्रमुख टर्मिनल असून त्यात सीएसएमटी, दादर, एलटीटी, मुंबई सेंट्रल आणि बांद्रा टर्मिनसचा समावेश आहे. या ठिकाणी दररोज सुमारे १५ ते २० हजार प्रवासी या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून ते दाखल होत आहेत.