Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मीरा रोड हत्याकांड: लिव्ह इन पार्टनरची हत्या, तुकडे करुन कुत्र्यांना घातल्याचा संशय

मीरा रोड हत्याकांड: लिव्ह इन पार्टनरची हत्या, तुकडे करुन कुत्र्यांना घातल्याचा संशय
, गुरूवार, 8 जून 2023 (16:01 IST)
(सूचना- या बातमीमधील तपशील काही वाचकांना विचलित करू शकतात)
 
मुंबईजवळच्या मीरा रोड परिसरात एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. एक 36 वर्षीय महिलेची तिच्या सोबत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या पार्टनरनं हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.
 
पण चार दिवसांनंतर घरातून येणाऱ्या घाण वासामुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि घडल्या घटनेचा उलगडा झाला.
 
मीरा भाइंदर पोलिसांनी मनोज साने या 56 वर्षीय व्यक्तीला आता अटक केली आहे आणि नया नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून पुढचा तपास सुरु केला आहे. सरस्वती वैद्य असं 32 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे.
 
काल (7 जून) रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर आता पोलीस तपासात त्याचे अधिक धक्कादायक तपशील पुढे येत आहेत. सरस्वती यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे करण्यात आलेले तुकडे पोलिसांनी त्यांच्या फ्लॅटमधून गोळा केले आहेत.
 
ते पिशव्यांमध्ये भरुन ठेवले होते आणि घराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पसरले होते. शरीराच्या काही भागांची विल्हेवाट अगोदरच लावण्यात आली होती असंही आता समजतं आहे.
 
पण या हत्येमागचं आणि त्यानंतरही निर्घृण वर्तनाचं कारण अद्याप पुढे आलेलं नाही. गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असणाऱ्या या दोघांमध्ये नेमकं काय झालं की प्रकरण एवढ्या टोकाला गेलं याचा पोलिस अद्याप तपास करत आहेत.
 
गेल्या वर्षी झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात अशाच प्रकारची मृतदेहाचे तुकडे करण्याची निर्घृणता पहायला मिळाली होती. त्यानंतर सरस्वती वैद्य यांच्या बाबतीतही तसंच घडलं आहे.
 
'काल सकाळपासून वास येऊ लागला'
मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे गेल्या तीन वर्षांपासून मीरा रोड इथल्या गीता आकाशदीप या सोसायटीमध्ये फ्लॅट क्रमांक 704 इथे राहात होते. तिथेच हे सगळं प्रकरण घडलं आहे.
 
या इमारतीतल्या इतर रहिवाशांनी काही माध्यमांना सांगितल्याप्रमाणे काल (7 जून) ला सकाळपासून या फ्लॅटमधून घाण वास येऊ लागल तशी सगळ्यांमध्ये अस्वस्थता पसरली.
 
या रहिवाशांच्या मते या दोघांचे इमारतीत इतर कोणाशी फारसे संबंध नव्हते त्यामुळे त्यांच्याविषयी अधिक काही त्यांना माहित नव्हतं.
 
या दोघांच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशानं 'एबीपी माझा'ला सांगितलं की सकाळपासून वास येऊ लागल्यावरही घर उघडेपर्यंत संध्याकाळ झाली होती.
 
"आम्हाला अगोदर वाटायचं की ते दोघं विवाहित आहेत. पण त्यांच्या संबंधांबद्दल आम्हाला माहिती नव्हती. आमचा त्यांच्याशी क्वचितच बोलणं व्हायचं. काल सकाळी घाण वास येऊ लागला तेव्हा वाटलं की कुठं एखादप प्राणी मरुन पडला असेल. बाकी सगळी घर उघडी होती. केवळ सानेंचाच फ्लॅट क्रमांक 704 बंद होता. जेव्हा माझ्या मुलानं दार वाजवून त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी (मनोज) म्हटलं की संध्याकाळी आल्यावर ते सगळं व्यवस्थित करतील. मग लगेच रुम फ्रेशनर फवारुन कुलूप लावून तो निघून गेला," असं हे रहिवाशी म्हणाले.
 
"मग आम्हाला संशय आला. सोसायटीच्या लोकांना सांगितलं. पण त्यातले बरेचसे बाहेर कामावर होते. जेव्हा ते संध्याकाळी आले तेव्हा या फ्लॅटच्या ब्रोकरला आणि पोलिसांनाही आम्ही कळवलं. पोलीस दरवाजा तोडून आत शिरले तेव्हा त्यांना हे सगळं दिसलं. पोलीस होते तेव्हाच मनोज परत आला आणि ब्रोकरनं त्याला ओळखलं. पोलिसांनी त्याला तिथंच पकडलं. आम्ही आत जाऊ शकलो नाही, पण आता समजतंय की पोलिसांना बॉडीचे तुकडे आत सापडले," रहिवाशी पुढे म्हणाले.
 
अजून एका रहिवाशानं दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही आता दगड कापण्यासाठी जी करवत वापरली जाते ती आत बेडरुममध्ये पाहिली. आत तशीच एक मोठी मशीनही होती. हॉलमध्ये पॉलिथिन पिशव्या होत्या. किचनमध्ये शरीराचे काही तुकडे पडले होते.
 
'तपास पूर्ण झाल्यावरच अधिक तपशील समोर येतील'
पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासानुसार चार दिवस अगोदरच सरस्वती यांना मारण्यात आलं आणि मधल्या दोन-तीन दिवसांपूर्वी मनोज यानं त्यांच्या मृतदेहाच्या काही तुकड्यांची विल्हेवाटही लावली आहे.
 
काही रहिवाशांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी गेल्या दोन-तीन दिवसांत मनोजला सोसायटीभोवतीच्या भटक्या कुत्र्यांना खायला घालतांना बघितलं आहे. पण नेमकं त्यात तथ्य काय हे पोलिस तपासत आहेत.
 
या भागाचे पोलिस उपायुक्त जयंत बजबले यांनी माध्यमांशी बोलतांना याला दुजोरा दिला की सरस्वती यांच्या शरीराचे अनेक तुकडे करण्यात आले होते. पण अधिक तपास केल्यावरच जास्त तपशील पुढे येतील.
 
पोलिसांना उरलेल्या शरीराचे तुकडे आणि हत्यारं मिळाली आहेत. हे तुकडे जे जे रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.
 
"पोलीस तिथं पोहोचले तेव्हा त्यांना एक मृतदेह अनेक तुकड्यांमध्ये आढळून आला. त्याचा पुढे तपास केला तेव्हा समजलं की त्या घरात मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे जोडपं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होतं. प्राथमिक तपास सांगतो आहे की, या महिलेची हत्या करण्यात आली. त्यांची ओळख सरस्वती वैद्य अशी पटली आहे आणि त्या तीन वर्षांपासून या घरात भाड्यानं रहात होत्या या घटनेबाबत नया नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढचा तपास सुरु आहे. तो झाल्याशिवाय अधिक काही सांगणं शक्य नाही. आरोपी मनोजला ताब्यात घेण्यात आलं आहे," असं पोलीस उपायुक्त बजबले म्हणाले.
 
राजकीय प्रतिक्रिया
या घटनेतील भयानक तपशील पाहता त्याच्या प्रतिक्रिया येणं सुरु झालं आहे. राजकीय नेत्यांच्याही प्रतिक्रिया येत आहेत.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे, "मुंबई येथील मीरा रोड परिसरात राहणा-या एका व्यक्तीनं आपल्या लिव्ह इन पार्टरनची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे. गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही अशी स्थिती आहे. महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीनं वाढत आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणातीळ आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ऑनलाईन गेमद्वारे धर्मांतरावर मौलवींची कबुली!