Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनात कोट्यवधींची उलाढाल; ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद

‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनात कोट्यवधींची उलाढाल; ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद
, गुरूवार, 16 मार्च 2023 (08:29 IST)
नवी मुंबई,: ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे आयोजन प्रथमच नवी मुंबईत करण्यात आले आहे. प्रदर्शनात कोट्यवधींची उलाढाल होत असून अनेक स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या मालास मोठ्या व्यापाऱ्यांकडून आणि घाऊक विक्रेत्यांकडून मागणी होत आहे.
 
सिडको एक्झीबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे ८ मार्चपासून आयोजित या प्रदर्शनाला नवी मुंबई, पनवेल, मुंबई आणि ठाणे येथील रहिवाशांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. उमेद अभियानांतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांच्या क्रियाशिलतेला चालना देण्यासाठी आणि त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी या राज्यस्तरीय भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
 
या प्रदर्शनात ५२५ हून अधिक स्टॉल उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील उमेद अभियानाच्या महिलांचे ३५०, नाबार्डचे ५० तर देशभरातून आलेल्या महिलांचे १२५ स्टॉल या ठिकाणी आहेत. या प्रदर्शनातील वस्तू, पदार्थ, कपडे आणि इतर सामानाची शुद्धता आणि वैशिष्ट्य याबद्दल खात्री झाल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतो आहे.
 
प्रदर्शनाचे आणखी ५ दिवस बाकी असताना १ कोटी १० लाखांची विक्री झाली असून शनिवारी, आणि रविवारी महिला उत्पादकांनी उत्पादित केलेल्या मालाला घाऊक विक्रेते आणि व्यापाऱ्यांकडून थेट मागणी होत आहे. या प्रदर्शनात बकरीच्या दुधापासून बनविलेले साबण, वनौषधी अशा बऱ्याच अशा दुर्मीळ वस्तू उपलब्ध आहेत. शनिवार-रविवार या दोन दिवसांत ८२ हजार ग्राहकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
 
या प्रदर्शनाला आता केवळ ५ दिवस शिल्लक असून या कालावधीत नागरिकांनी आणखी जास्त प्रतिसाद द्यावा व या ग्रामीण महिलांच्या स्टॉलवर खरेदी करून महिलांच्या स्वावलंबनाला मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पत्नी, मुलीची हत्या करून आयटी अभियंत्याची आत्महत्या