महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा ठाण्याच्या दिशेने रवाना झाला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (12 एप्रिल) संध्याकाळी ठाणे पश्चिमच्या डॉ. मूस रोडवर सभा होणार आहे. या सभेला मनसेनं 'उत्तर सभा' असं नाव दिलंय.
या सभेआधी राज ठाकरेंचे ठाण्याच्या पाचपाखाडी भागात 'मुंबई मे बैठा हिंदुओ का राजा अपनी हिफाजत चाहिये तो मनसे आजा,' असे हिंदी भाषेमध्ये फलक लागलेले बघायला मिळतायेत.
गुढीपाडव्याच्या मनसेच्या सभेत हिंदुत्व, उत्तरप्रदेशच्या विकासाचं कौतुक यामुळे मनसेचा मराठीचा मुद्दा आता मागे पडणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंनी मराठी भाषा, मराठी माणसांचे हक्क इत्यादी मुद्दे अजेंड्यावर ठेवले. त्याचबरोबर 'महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीतच बोलावं लागेल' हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार सांगितले आहे.
"राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. 'मुंबई मै बैठा है हिंदुओ का राजा, अपनी हिफाजत चाहिए तो मनसे आजा!' ही वाक्यरचना राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला साजेशी आहे. मी ती मराठीत करण्याचा प्रयत्न केला. पण त्याची शब्दरचना नीट होत नव्हती. ती वाचायलाही चांगली वाटत नव्हती म्हणून आम्ही हिंदीमध्ये लिहिलं."हे बॅनर लावणारे मनसेचे विभाग अध्यक्ष महेश कदम म्हणाले.
"मराठी भाषेचा मुद्दा हा मनसे कधीच सोडणार नाही. तोच आमचा प्रमुख मुद्दा आहे. आम्ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी भांडत राहणार. पण देशपातळीवर राज ठाकरे हिंदुत्वाचं नेतृत्व करावं ही सर्वांची इच्छा आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे हिंदीत बॅनर लावले म्हणून मराठीचा मुद्दा सोडला असं नाही."महेश कदम म्हणाले.