मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या परिसरात सुरु असलेलं धुनर्विद्या प्रशिक्षण केंद्र काही वर्षापासून बंद आहे. त्यामुळे हे केंद्र पुन्हा सुरु करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये त्यांनी शिवसेनेवर थेट बोचरी टीका केली आहे. खेळाडूंना जर प्रशिक्षणासाठी त्यांच्या हक्काची जागा मिळत नसेल तर ऑलिम्पिकमध्ये भारताला पारितोषिक कसं मिळणार ? खेळाडूंचे खच्चीकरण केले जात असेल तर ऑलिम्पिकमध्ये पद मिळवून देणाऱ्या खेळाडूंना कोणत्या अधिकाराने वर तोंड करून शुभेच्छा देता असा सवालही मनसेने केला आहे.
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या परिसरात एक धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र सुरू होतं.अनेक खेळाडू या ठिकाणी धुनर्विद्याचा सराव करण्यास येत होते. एके दिवशी सरावादरम्यान, एका खेळाडूकडून चुकून बाण बाजूलाच असणाऱ्या महापौर निवास परिसरात जाऊन पडला. यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. पण केवळ महापौर निवासस्थानात बाण पडल्याच्या कारणातून हे प्रशिक्षण केंद्र बंद करण्यात आल्याचा दावा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. एवढच नाही तर धनुर्विद्या आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्हं असणारं धनुष्यबाण याची तुलना करत देशपांडे यांनी सेनेवर टीकास्त्र सोडलं. या प्रशिक्षण केंद्रात शिकणारे खेळाडू केंद्र बंद असल्याने अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे आर्चरी क्लबसाठी पर्यायी जागा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
क्लबसंदर्भात स्थानिक आमदार, नगरसेविका आणि सभागृहनेत्यांशी पत्रव्यवहार केला होता, पण या मागणीला नेत्यांकडून केराची टोपली दाखवण्यात आल्याचंही देशपांडे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हंटल आहे.