मुंबई दसऱ्याच्या सणादिवशी महाराष्ट्रातून एक अत्यंत वेदनादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. यामध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार कार आणि अॅम्ब्युलन्स यांच्यात झालेल्या धडकेने हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पश्चिम उपनगरातील वांद्रे ते दक्षिण मुंबईतील वरळीला जोडणाऱ्या सी लिंक पुलावरील पोल क्रमांक 76 आणि 78 दरम्यान पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पीएमओने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हवाला देत म्हटले आहे की, मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर झालेल्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे मी दु:खी आहे. मी शोकाकुल कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अपघाताच्या तपासादरम्यान असे आढळून आले की, प्रथम एक कार पुलावरीलडिवाइडरवर आदळली, त्यानंतर त्याच्या मदतीसाठी एक रुग्णवाहिका पाठवण्यात आली. ते म्हणाले की इतर दोन कार चालकांनी त्यांची वाहने मदतीसाठी थांबवली.
दरम्यान, मागून येणाऱ्या दुसऱ्या कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन कार आणि रुग्णवाहिकेला धडक दिली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
ते म्हणाले की, एक महिला आणि सी-लिंकच्या कर्मचाऱ्यासह 13 जखमींना रुग्णालयात नेण्यात आले, त्यापैकी पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितले की, 6 जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर दोघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना उपचारानंतर घरी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.