२६/११ सारखा हल्ला पुन्हा करण्यात येणार असल्याचा धमकीचा संदेश मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला मिळाला होता. त्यावर मुंबई एटीएसने कारवाई करत विरारमधून एकाला ताब्यात घेतलं आहे. ज्या क्रमांकावरून मेसेज आलेला तो क्रमांक भारताबाहेरील असल्याचं स्पष्ट झालं आहे.
भारतात नुकताच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते. असं असतानाच दोन दिवसांपूर्वी श्रीवर्धन येथे एक अज्ञात बोट सापडली. या बोटीमध्ये एके ४७ आणि काही जिवंत काडतुसे सापडली. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात एकच खळबळ माजली. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ कार्यवाही करत या बोटीचा छडा लावला असता ही बोट ऑस्ट्रेलियाची असून चुकून श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर आली असल्याची माहिती समोर आली आहे.