अभिनेता शाखरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रेव्ह पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आर्यन खानला NDPS act 8C, 20 B, 27 आणि 35 या कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे.
मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) चौकशी करण्यात आली तसेत त्याची जे. जे. मेडिकल महाविद्यालयात चाचणी करण्यात आली आहे.
मुंबई येथे एका क्रूझवर NCB ने काल (2 ऑक्टोबर) मध्यरात्री धाड टाकली होती. या प्रकरण आर्यन खान याची चौकशी सुरू असल्याची माहिती NCB मुंबईचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे.
आर्यन खानसह याप्रकरणात आठ जणांना NCB ने ताब्यात घेतलं आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा अशी त्यांची नावे आहेत, असं विभागाने सांगितलं.
मुंबईतील एनसीबी कार्यालयात आर्यन खान आणि इतरांची चौकशी केली जात आहे. अशा परिस्थितीत आर्यन खानचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे, ज्यात तो हातात बॅग घेऊन दिसत आहे. यामध्ये एक व्यक्ती आर्यनला काहीतरी सांगत असल्याचं देखील दिसून येत आहे. आर्यन खानने यावेळी पांढरा टी-शर्ट, लाल शर्ट, निळ्या रंगाची जीन्स आणि काळा मास्क घातला आहे.
या सर्वांचा संबंध मुंबईतील क्रूझवर होत असलेल्या कथित रेव्ह पार्टीशी आहे. त्याबाबत त्यांची चौकशी करण्यात येत आहे, असं वानखेडे यांनी सांगितलं आहे.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा निःपक्षपातीपणे तपास होईल, असं मत NCB प्रमुख एस. एन. प्रधान यांनी नोंदवलं आहे.
"आम्ही या प्रकरणात अतिशय निःपक्षपातीपणे काम करत आहोत. या प्रकरणात बॉलीवूड अथवा धनाढ्य लोकांचाही संबंध असल्याची माहिती मिळतेय, पण तरीही आमचं काम आम्ही निःपक्षपातीपणे करू. कायद्याच्या कक्षेत राहूनच आम्हाला कामाची अंमलबजावणी करावी लागेल," असं प्रधान म्हणाले.