मुंबई महानगरपालिका आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. मुंबई महापालिकेने धनाढ्यांवर सवलतींचा वर्षाव केला. तर सामान्य मुंबईकरांच्या गळ्यात करांचा धोंडा मारल्याचा आरोप भाजपने केला आहे.
अंदाजित उत्पन्नाच्या केवळ 25 टक्के उत्पन्न आतापर्यंत प्राप्त झाले आहे. तर, कोविडवर झालेल्या 2100 कोटींच्या अतिरिक्त खर्चामुळे या वर्षीच्या अर्थसंकल्पात मोठी तूट येण्याची शक्यता भाजपने वर्तवली आहे. त्यामुळे दैनंदिन खर्चासाठी कर्ज रोखे काढण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.
वर्ष 2020-21 मध्ये महापालिकेने सादर केलेल्या अर्थसंकल्पाची सद्यस्थिती गंभीर आहे. गेल्या 1 एप्रिल 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत प्रत्यक्षात प्राप्त झालेले उत्पन्न अंदाजित उत्पन्नाच्या केवळ 25 टक्के आहे. उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर अंदाजित प्राप्ती 6768.58 कोटी पैकी केवळ 734.34 कोटी प्राप्त झाली आहे.
तर विकास नियोजन खात्याची प्राप्ती 3879.51 पैकी केवळ 708.20 कोटी म्हणजे केवळ 14 टक्के एवढीच उत्पन्नाची प्राप्ती 31.12.2020 पर्यंत झालेली आहे.