मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेने सोमवारपासून मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे खुली केली आहेत. सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत या सर्व गोष्टी खुल्या ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.
सर्व गोष्टी खुल्या केल्या गेल्या असल्या तरी यासाठी पालिकेतर्फे लागू करण्यात आलेल्या नियम आणि अटींचं बंधन पाळण आवश्यक आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर उपाययोजनांचे नागरिकांना अनिवार्यपणे पालन करावे लागणार आहे. तसंच लसीचे दोन डोस घेतलेल्या सामान्य प्रवाशांनाही रविवार १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
मुंबईत कोरोना परिस्थिती अटोक्यात आली असून काही दिवसांपासून रुग्णवाढ आणि मृत्युदरात घट झाली आहे. त्यामुळे मुंबईतील करोना निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यासंबंधी आज आदेश जारी केले आहेत.
आजपासून सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू करण्यात आली असून करोना लसीच्या दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करता येणार आहे. दोन डोस घेतलेल्या आणि १४ दिवस उलटून गेलेल्या सामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.