Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ : उद्धव ठाकरे

मुंबईत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ : उद्धव ठाकरे
, शनिवार, 1 जानेवारी 2022 (21:03 IST)
गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेसमोर आले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना मोठी भेट दिली आहे. मुंबईकरांच्या ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. तसेच या निणर्याची तत्काळ अंमलबजावणी करा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. मुंबई’कर’ म्हटल्यावर मुंबईकरांनी काय फक्त करच भरायचे का? मुंबईकरांना सेवा देखील तितक्याच चांगल्या मिळाल्या पाहिजेत या उद्देशातून आणि शिवसेनेनं वचननाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईतील ५०० चौरस फुटांखालील घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याच्या निर्णयाला अखेर आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आणि निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचेही आदेश प्रशासनाला दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर देखील भाष्य केलं.
जनतेला खोटी वचनं द्यायची नाहीत असे संस्कार शिवसैनिकावर आहेत. निवडणुकीआधी शिवसेनेच्या वचननाम्यात मुंबईकरांना ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करणार असं आश्वासन दिलं होतं. ते आज पूर्ण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. १९६६ पासून जन्माला आलेली शिवसेना मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळतेय. आमची ही चौथी पिढी, आजोबा,वडील, मी आणि आता आदित्य. काम म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर मुंबईवरचं प्रेम आम्ही पुढे नेत आहोत. शिवसेनाप्रमुख स्वत: जाऊन कामाची पहाणी करत. मी ही नालेसफाई, दहिसर नदीचे काम असेल किंवा सौंदर्यीकरणाचे काम असेल ते जाऊन पहात होतो आता हे काम आदित्य करत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

जे बोलतो ते करतो, केवळ तोंडातून वाफा काढत नाही
यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. आम्ही जे बोलतो, ते करतो. केवळ तोंडातून वाफा काढत नाही, असा टोला विरोधकांना लगावला.सन २०१७ मध्ये शिवसेनेने वचननामा दिला होता. त्यातील अनेक वचने पूर्ण केली आहेत. पण मुंबईकरांसाठी ५०० फूटांपर्यंत मालमत्ता कर रद्द करण्याचे वचन विचारपूर्वक दिले होते. ५०० चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो. अनेक जण येतात आणि असे बोलायचे असते, असे बोलून जातात. आम्ही तोंडातून वाफा काढत नाही. जे बोलतो ते करतो. मी मुंबईकरांना वचन देतो तुमच्या आरोग्याची आणि सर्व गोष्टींची काळजी घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. जनतेच्या कष्टातून सगळी कामे होत असतात. आपण ते काम केले आणि त्याची मोठी जाहिरात करायची ते मला स्वतःला पटत नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सध्या लॉकडाऊन नाही, ऑक्सिजनच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेऊ - राजेश टोपे