Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवाजी पार्कसाठी ठाकरे गटाकडून पालिकेला स्मरणपत्र

mumbai mahapalika
, बुधवार, 4 ऑक्टोबर 2023 (08:04 IST)
दसऱ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचा की, माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा होणार हे लवकरच समोर येणार आहे. मात्र, ठाकरे गटाने सदर मैदान मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाच्या अखत्यारीत येते त्या कार्यालयाकडे 7 ऑगस्ट रोजीच परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र अद्यापही त्यांना परवानगी न मिळाल्याने ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई यांनी पालिका विभाग कार्यालयाला मंगळवारी (3 ऑक्टोबर) एक स्मरणपत्र दिले आहे. तसेच, तातडीने दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
 
दीड वर्षांपूर्वी मूळ शिवसेना पक्षात तत्कालीन नेते एकनाथ शिंदे यांनी काही समर्थक आमदारांसह बंडखोरी करून भाजपशी संधान साधले. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अल्पमतात आल्याने स्वतःहून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन ते सत्तेच्या खुर्चीवरून पायउतार झाले. त्यानंतर राजकीय घडामोडी वेगाने घडल्या आणि एकनाथ शिंदे हे शिवसेना गटाकडून मुख्यमंत्री पदाचे दावेदार झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुची मिळविली. तर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे उप मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून ठाकरे व शिंदे गटातील वादविवाद टोकाला जात आहेत. शिवाजी पार्क म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटात चढाओढ सुरू आहे.
एक महिना उलटूनही परवानगी नाही
 
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे दसरा मेळाव्यासाठी परवानगी घेण्याकरिता सर्वप्रथम 7 ऑगस्ट 2023 रोजी महापालिकेच्या जी/ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना पत्र दिले. मात्र आज एक महिना व्हायला येत असतानाही अद्यापही सदर मेळाव्याच्या परवानगीबाबत पालिका विभाग कार्यालयामार्फत ठाकरे गटाला काहीच कळविण्यात न आल्याने अखेर ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी मंगळवारी पुन्हा एकदा जी/उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त यांना एक स्मरणपत्र दिले आहे.
 
 
या स्मरणपत्रात म्हटले आहे की, मंगळवार, 24 ऑक्टोबर 2023 रोजी सायं. 5 ते 10 वाजेपर्यंत विजयादशमीच्या मुहूर्तावर शिवसेना (उद्भव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा ‘दसरा मेळावा’ शिवाजी पार्क, दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे होणार आहे. त्यासाठी परवानगीकरिता आपणाकडे 7 ऑगस्ट 2023 रोजी शिवसेना (उद्भव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून एक पत्र देण्यात आले होते. मात्र अद्यापही आपणाकडून दसरा मेळाव्याकरिता परवानगी देण्यात आलेली नाही. यासाठी सदर स्मरणपत्र पाठवित आहे. तरी कृपया सदर स्मरणपत्राचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला दसरा मेळाव्याची परवानगी देण्याबाबत सहकार्य करावे ही नम्र विनंती. सोबत 7 ऑगस्ट 2023 रोजीचे पत्र जोडत आहे, असे नमूद करून खाली खासदार अनिल देसाई यांनी सही केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Animal Day 2023: जागतिक प्राणी दिनाचा इतिहास, महत्त्व आणि थीम जाणून घ्या