Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साहेब आज तुम्ही हवे होतात', बाळासाहेब ठाकरेंना वाहिली आदरांजली- नारायण राणे

साहेब आज तुम्ही हवे होतात', बाळासाहेब ठाकरेंना वाहिली आदरांजली- नारायण राणे
, गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (14:47 IST)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अखेर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले आहे. आपल्या जनआशीर्वाद यात्रेच्या पहिल्या दिवशी आपण बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर जाणार असल्याचं राणे यांनी जाहीर केलं होतं.
 
शिवसेनेच्या नेत्यांकडून सुरुवातीला त्यास थोडाफार विरोध झाला. पण अखेरीस राणे यांना स्मृतिस्थळावर जाण्यापासून रोखणार नसल्याचं शिवसेनेने स्पष्ट केलं.
 
दरम्यान, राणे यांनी शिवसेनेचा विरोध न जुमानता स्मृतिस्थळावर जाण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार त्यांनी स्मृतिस्थळावर दाखल होत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन केलं.
 
'साहेब आज तुम्ही हवे होतात, मला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही हवे होतात, तुमची खूप आठवण येते', असं स्मृतिस्थळाजवळ जाऊन आपण म्हटल्याचं राणे यांनी सांगितलं.
 
बाळासाहेब असते, तर आज डोक्यावर हात ठेवून त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला असता. असंच पुढे जात राहा, असा आशीर्वाद त्यांनी दिला असता, असं राणे म्हणाले.
 
नारायण राणे आज (19 ऑगस्ट) सकाळी साडेअकराच्या सुमारास दिल्लीहून मुंबई येथे दाखल झाले. त्यानंतर अंधेरी परिसरातील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेस सुरुवात झाली.
 
राणे यांनी मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर राणे यांची यात्रा मार्गस्थ झाली.
 
राणे यांची जनआशीर्वाद यात्रा यानंतर वांद्रे आणि कलानगरच्या दिशेने जाणार आहे. त्याठिकाणी राणे यांची सभा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दादरच्या शिवाजी पार्क परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेणार असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
 
यात्रेदरम्यान, खेरवाडी येथे नारायण राणे यांचं भाषण झालं. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह राणे यांचा पोटनिवडणुकीत पराभव करणाऱ्या माजी आमदार तृप्ती सावंत यासुद्धा उपस्थित होत्या.
 
महाराष्ट्रात आमचा जन्म झाला आहे. या भूमीवर फिरण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही दोन वर्षात राज्याला कसं मागे नेलं, हे आम्ही जनआशीर्वाद यात्रेतून लोकांना सांगू, आगामी महापालिका निवडणुकीत तुम्हाला धडा शिकवू, असा इशारा नारायण राणे यांनी शिवसेनेला यावेळी दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नरेंद्र मोदी यांचं पुण्यातलं 'मंदिर' चार दिवसांतच का हटवण्यात आलं?