शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित मुंबईतील दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी झाडाझडती सुरू असून याप्रकरणी काही लोकांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या वकिलांनी आज सकाळी ८.३० ते ९.३० वाजता कोठडीत भेट घेतली. राऊत चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीनं केला होता. यातच आता मुंबईतील दोन ठिकाणी छापे मारले असल्याची माहिती समोर आली आहे.
पत्राचाळ पुनर्वसन प्रकरणी शिवेसना खासदार संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहे. रविवारी सकाळी भांडूपच्या मैत्री बंगल्यावर ईडीने छापे मारले. त्याचवेळी दादरच्या गार्डन पार्कवरही ईडीच्या अधिकाऱ्यांकडून सर्च ऑपरेशन सुरू होते. तसेच, गोरेगाव येथेही ईडीने धाड मारली. भांडूपच्या घरात साडेअकरा लाखांची कॅश सापडल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. तिथेही त्यांची आठ तास चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. दरम्यान, पीएमएलए कोर्टाने त्यांना चार ऑगस्टपर्यंतची ईडी कोठडी सुनावली आहे.