Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिट अँड रन प्रकरणात शिंदे गटातील नेत्याचा मुलगा संशयित, काय आहे प्रकरण?

हिट अँड रन प्रकरणात शिंदे गटातील नेत्याचा मुलगा संशयित, काय आहे प्रकरण?
, मंगळवार, 9 जुलै 2024 (00:15 IST)
"तो मुलगा गाडी चालवत होता. गाडीत दोन जण होते. चालक आणि त्याच्या बाजूला एकजण बसला होता. त्याने गाडी थांबवली नाही. अपघातानंतर माझ्या बायकोला फरफटत नेलं. नाहीतर ती वाचली असती."
"आम्ही त्याच्या गाडीच्या बोनेटवर पडलो. थांब थांब म्हणालो पण त्याने सी लिंकपर्यंत फरफटत नेलं. माझी बायको तर परत येणार नाही आता. आरोपीला शिक्षा द्यावी," असं सांगत प्रदीप नाखवा यांना रडू कोसळलं.
 
प्रदीप आणि त्यांची पत्नी कावेरी नाखवा रविवारी (7 जुलै) पहाटे मुंबईतील ससून डाॅक येथून वरळीतील आपल्या घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला BMW कारने धडक दिली. यात कावेरी यांचा मृत्यू झाला.
 
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात वेगवेगळ्या भागात चार 'हिट अँड रन' च्या घटना घडल्या असून यात पाच जणांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजं असताना राज्यातील मुंबई, पुणे आणि संभाजीनगर या ठिकाणी चार अपघात झाले आहेत.
 
मिहिर शहा फरार
मुंबईत वरळी येथील अ‍ॅट्रीया माॅलसमोर रविवारी (7 जुलै) पहाटे BMW कार चालकाने दुचाकीला जोरात धडक दिली.
 
या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य गाडीच्या बोनेटवर पडले. तसंच त्यांना फरफटत नेल्याची माहितीही समोर येत आहे. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
 
मुंबईतील वरळी कोळीवाडा या परिसरात राहणारे नाखवा दाम्पत्य रविवारी (7 जुलै) पहाटे साधारण पाच वाजताच्या सुमारास दक्षिण मुंबईतील ससून डाॅक येथे मासे खरेदीसाठी गेले होते.
 
नाखवा कुटुंब मासेविक्री करतं. यासाठी डाॅकमधून मासे आणण्यासाठी पहाटे गेले असता तिथून परत येत असताना अॅट्रीया माॅल समोरील रस्त्यावर बीएमडब्ल्यूने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
 
प्रदीप आणि कावेरी नाखवा हे दोघंही कारच्या बोनेटवर आदळले. तरीही कार चालकाने गाडी थांबवली नाही तर दोघांनाही फरफटत नेले.
 
यात कावेरी जवळपास 100 मीटरपर्यंत फरफटत गेल्याने चाकाखाली येवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रदीप नाखवा जखमी झाले.
 
जखमी अवस्थेतही त्यांनी टॅक्सी पकडून कार चालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फरार झाला.
या घटनेनंतर 25 वर्षीय कार चालक मिहिर शहा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिहिर शहा शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
 
मिहिरसोबत कारमध्ये राजऋषी बिडावत याच्याविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजेश शहा आणि बिडावत दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
या प्रकरणी वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
 
पोलिसांच्या तपासात आतापर्यंत काय आढळलं?
वरळी पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये बीएमबडब्ल्यू कारने कावेरी यांना उडवल्याचे समोर आले आहे.
 
कार चालक मिहिर शहा पसार असून त्याचा फोन बंद आहे. तसंच अपघातानंतर गाडीची नेम प्लेट सुद्धा काढून टाकण्यात आली होती.
 
पोलीस उपायुक्त अभिषेक यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं, "बिडावत याला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून पुढचा तपास सुरू आहे."
रविवारी दुपारनंतर गाडीची तपासणी करण्यासाठी फाॅरेंसिक टीमला सुद्धा तपासासाठी बोलवण्यात आलं होतं.
 
वरळीत अपघात झाल्यानंतर मिहिर तिथून पळून गेला. त्याने वांद्रे येथे कार सोडली. पोलिसांनी अपघात झालेली कार वांद्र्यातून ताब्यात घेतली.
 
घटनेला 24 तास उलटून गेले तरी आरोपी कार चालक मिहिर शहा फरार आहे. त्याचे वडील राजेश शहा आणि त्याच्यासोबत कारमध्ये असलेल्या बिडावत याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
 
मिहिर याने दारूच्या नशेत गाडी चालल्याचा संशय असून यामध्ये महिलेचा मृत्यू होऊनही ही माहिती राजेश शहा आणि राजऋषी यांनी पोलिसांनी दिली नाही या प्रकरणी दोघांना या आरोपी करून रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली.
 
कोण आहे मिहिर शहा?
वरळीतील बीएमडब्लूने दुचाकीला उडवून महिलेला फरफटत नेल्याच्या घटनेत मिहिर शहा हा मुख्य आरोपी फरार आहे.
 
शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांचा मिहिर शहा हा मुलगा आहे. राजेश शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आहेत.
 
मिहिर शहा 24 वर्षांचा असून त्याचं शिक्षण दहावीपर्यंत झालेलं आहे.
 
राजेश शहा शिवसेनेचे पालघर जिल्ह्याचे नेते असून ते बांधकाम व्यावसायिक म्हणूनही ओळखले जातात.
 
एप्रिल 2023 मध्ये त्यांची शिवसेनेचे उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली.
 
'हिट अँड रन' वरून राजकारण तापलं
वरळीतल्या या घटनेनंतर या मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी (7 जुलै) प्रदीप नाखवा यांची भेट घेतली. तसंच त्यांनी पोलीस स्टेशनलाही भेट दिली.
 
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, "या घटनेतील आरोपी चालक फरार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजही जप्त करण्यात आले आहे. या घटनेतील जो तरुण आरोपी आहे, त्याला लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा व्हावी," अशी मागणी त्यांनी केली.
तसंच आरोपी कोणत्याही पक्षाचा असला तरी यावरून राजकारण करणार नाही असंही ते म्हणाले.
 
"परंतु यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नको," असंही त्यांनी म्हटलं.
 
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तसंच राज्यातील वाढत्या हिट अँड रन केसेस प्रकरणी सरकारवर टीकाही केली जात आहे.
 
माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "मी पोलिसांशी चर्चा केली आहे. कायद्यासमोर सर्व समान असतात. आम्ही कोणालाही वाचवण्याचे काम करणार नाही. घडलेली घटना दु:खद आहे. असे अपघात होऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करेल."
 
पुण्यात एका रात्रीत दोन घटना
पुण्यात रात्री शहराच्या वेगवेगळ्या भागात दोन हिट अॅंड रन च्या घटना घडल्या आहेत. यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
 
पहिला प्रकार घडला आहे तो जुन्या मुंबई पुणे हायवे वरील हॅरिस ब्रीजच्या परिसरात पोलिसांची गस्त सुरू असताना. खडकी पोलीस ठाण्यातील बीट मार्शल समाधान कोळी आणि पी.सी.शिंदे हे रात्री गस्त घालण्यासाठी दुचाकी वरुन निघाले होते. यावेळी पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली.
 
अपघातानंतर वाहनचालक वाहनासह फरार झाला आहे. या अपघातामध्ये समाधान कोळी यांचा मृत्यू झाला आहे. तर पी सी शिंदे जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या ठिकाणचे सीसीटिव्ही कॅमेऱ्यातले फुटेज पोलिसांनी तपासल्यानंतर धडक देणारे वाहन हे पांढऱ्या रंगाची इनोव्हा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
याविषयी पोलीस उपायुक्त विजय मगर म्हणाले, “या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर एक कर्मचारी जखमी झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून वाहनचालकाचा शोध घेतला जात आहे.”
 
तर पिंपळे सौदागर भागात झालेल्या अपघातामध्ये पोलीस कॅान्स्टेबल सचिन माने यांचा मृत्यू झाला आहे. माने हे सीआयडीमध्ये कार्यकत होते. ते पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर मधून दुचाकी वरुन जात असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे.
 
छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडलं?
छत्रपती संभाजी नगरमध्येही 'हिट अँड रन' ची घटना घडली असून यात पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाला आहे.
 
संभाजीनगरपासून बीड येथे जाणाऱ्या महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कारने डिव्हायडर ओलांडून दुचीकीला जोरदार धडक दिली.
 
या भीषण अपघातात कारखाली आलेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लेंबेवाडी फाट्याजवळ घडली.
 
संभाजीनगर जिल्हा न्यायालयात ज्युनियर वकील म्हणून काम करत असलेले अॅड. सतीश शाहुजी मगरे आणि पत्नी तेजल मगरे हे दोघे स्कुटीने रविवारी (7 जुलै) अंबड येथे कार्यक्रमाला गेले होते.
 
कार्यक्रमानंतर आपल्या घरी छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जाणाऱ्या कारने त्याला उडवले.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या डिव्हायडरला धडकून महामार्गाच्या दुसऱ्या बाजूने जात असलेल्या स्कूटीवर जाऊन जोरदार धडकली. यात पती- पत्नीचा मृत्यू झाला.
 
कारचालक घटनास्थळावरून पसार झाला होता. घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
 
'सामान्य माणसाचा जीव किती सहज घेता येतो'
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबईतील 'हिट अँड रन' प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ते म्हणाले, "आमच्यातून गेलेल्या गद्दार लोकांची जी सेना आहे असं म्हणतात त्यांच्यातील शहा या उपनेत्या मुलगा त्याच्याकडून ही घटना घडलेली आहे. अद्यापही हा आरोपी फरार आहे.
 
"सत्ताधारी पक्षातील नेत्याचा मुलगा अशाप्रकारे सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला फरफटत काय नेतो, धडक लागल्यानंतरही ती भगिनी वाचली असती. यात तिचा जीव गेलेला आहे. सामान्य माणसाचा जीव किती सहज या महाराष्ट्रात घेता येतो याचं उदाहरण आहे हे. सरकार याबाबतीत गंभीर नाही," दानवे सांगतात.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mumbai Rains: मुंबई आणि उपनगरात अतिवृष्टीचा इशारा,तिन्ही सैन्यदल सतर्क