संघर्षाची रोज नवनवी मैदानं हुडकणारा शिवसेनेतला अंतर्गत संघर्ष आता अक्षरश: मैदानावर पोहोचला आहे. ते मैदान आहे दादरचं शिवाजी पार्क, म्हणजे शिवसेनेच्या भाषेत शिवतीर्थाचं. शिवसेनेची परंपरा म्हटली जाणारा 'दसरा मेळावा' कोण घेणार हा यक्षप्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा ठरला आहे.
बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वर्षं शिवाजी पार्कच्या दसऱ्या मेळाव्याला संबोधित केलं. शिवसेनेची राजकीय भूमिका या भाषणातून स्पष्ट व्हायची. त्यांच्यानंतर पक्षाची सूत्रं उद्धव ठाकरे यांच्याकडे आली आणि उद्धव हेसुद्धा दसरा मेळाव्याचं मुख्य भाषण करु लागले. शिवसेनेची ओळख ठरलेली परंपरा म्हणून दसरा मेळावा महाराष्ट्राचं कुतूहल झाला.
त्याचं महत्त्व इतकं की, राज ठाकरे यांनी जेव्हा शिवसेनेच्याच वाटेवरुन पुढे जाऊन स्वत:चा पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनाही अशीच ओळख ठरवणारी परंपरा सुरु करणं आवश्यक ठरलं. त्यामुळे त्यांनीही शिवाजी पार्कच्या मैदानात त्यांचा गुढीपाडव्याचा मेळावा सुरु केला. दसरा मेळावा शिवसेनेचीच ओळख राहिला.
शिवसेना त्यांची ज्यांचा दसरा मेळावा, हे सूत्रही त्यातूनच पुढे आलं. त्यासाठीच आता आम्हीच खरी शिवसेना म्हणणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले बंडखोर आमदार-खासदार शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
शिवसेनेवर दावा सांगणाऱ्यांना दसरा मेळाव्यावर दावा सांगणे ओघाओघाने आलेच. त्यातून शिवसेना आमची आहे आहे राजकीय असा संदेशही देण्याचा हा प्रयत्न आहे, असं म्हटलं जातं आहे.
उद्धव ठाकरेंनी 'दसरा मेळावा शिवाजी पार्कलाच होणार' असं म्हटलं आहे. वास्तविक शिवसेनेनं ठरलेल्या नियमांप्रमाणे महापालिकेकडे शिवाजी पार्कवर मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केला होता.
पण त्यानंतर शिंदे गटाच्याही मेळाव्यासाठी हालचाली सुरु झाल्या. शिंदे गटातर्फे सदा सरवणकर यांनी परवानगीसाठी अर्ज केला. त्यानंतर वाद सुरु झाला.
त्यातच मनसे कार्यकर्त्यांकडूनही 'मनसे'च्या दसरा मेळाव्याचीही चर्चा होऊ लागली. यावर राज ठाकरेंनी अद्याप काहीही मत व्यक्त केलं नाही आहे, पण आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा चालवतो आहोत असं त्यांनी नुकतंच पक्षाच्या मेळाव्यात म्हटलं आहे.
त्यामुळे बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा वारसा सांगण्यासाठी सेनेतूनच जन्माला आलेल्या तीन गटांचा दावा आहे आणि दसरा मेळावा हे त्या वारशाचं प्रतिक आहे.
एकनाथ शिंदेंच्या गटाची उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेवरच्या हक्काची लढाई सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगातही सुरु आहे. पण लोकांच्या मनात ते उतरवायचं असेल तर दसरा मेळावा, जो खऱ्या शिवसेनेचा मानला जातो, तो आपल्याकडे घेऊन अधिकृतता मिळवण्याचं हे राजकारण आहे.
त्याच महत्त्व जमिनीवरच्या लढाईत सर्वाधिक आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याची ही परंपरा, शिवाजी पार्क म्हणजे शिवतिर्थ आणि त्यांच्या संबंधांचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. शिवसेनेच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या राजकीय कारकीर्दीतल्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी या मेळाव्यात झाल्या आहेत.
दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क
30 ऑक्टोबर 1966 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा घेतला होता. दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे एक समीकरण बनलं.
इतकी वर्षं शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा घेण्यात येतो. अनेक राजकीय पक्षांकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येतं. पण एक पक्ष, एक नेता आणि एक मैदान हे शिवसेनेतच बघायला मिळत असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात.
बाळासाहेबांचं शिवाजी पार्कवर प्रचंड प्रेम होतं. बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क या दोघांचा जन्म एकाचवेळी झाल्याच खूप कमी जणांना माहिती असल्याचं 'ठाकरे विरुद्ध ठाकरे' पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात. "शिवाजी पार्कला पूर्वी माइन पार्क असं संबोधलं जात होतं. 1927 साली या मैदानाचं नावं शिवाजी पार्क देण्यात आलं. याच साली बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला होता."
दसरा मेळाव्याची ही परंपरा कायम राहिली आणि इथं बाळासाहेबांनी दिलेली राजकीय भूमिका शिवसैनिकांनी पुढे जाऊन आपापल्या भागांमध्ये नेणं हे समीकरण बनलं. बाळासाहेबांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा या मेळाव्यात केल्या. शिवसेनेच्या भाषेत याला 'विचारांचं सोनं लुटणं' असं म्हटलं जातं.
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात, "शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर बराच काळ जाहीर सभा झालेली नव्हती. कार्यकर्ते घरी येऊन भेटत होते. शेवटी जाहीर सभा घेण्याचं ठरलं आणि ती शिवाजी पार्कवर घ्यायचं ठरलं. तेव्हा शिवाजी पार्क मैदान पूर्ण भरेल की नाही अशी भीती खुद्द बाळासाहेब ठाकरेंना वाटत होती.
म्हणून नेहमी जिथे एका कडेच्या टोकाला स्टेज उभारलं जातं, त्याऐवजी मधोमध स्टेज उभारण्यात आलं. म्हणजे समोरचा छोटा भाग भरला तरी चालेल. पण प्रत्यक्षात प्रचंड गर्दी झाली. अजूनही दसरा मेळावा तिथेच होतो. एखाद्या पक्षाने, दरवर्षी एका ठराविक दिवशी, एकाच जागी वर्षानुवर्षं सलग सभा घेणं हा रेकॉर्ड असावा."
1925 मध्ये या मैदानाला म्हटलं जायचं 'माहिम पार्क'. त्यानंतर याचं नामकरण शिवाजी पार्क असं करण्यात आलं. लोकवर्गणीतून नंतर इथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला.
पण या 'शिवाजी पार्क'ला शिवतीर्थ म्हणायला सुरुवात केली आचार्य अत्रेंनी. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी या मैदानाचा शिवतीर्थ असा उल्लेख करायला सुरुवात केल्याचं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात. 'आज शिवतीर्थावर आचार्य अत्रेंची जाहीर सभा' असे बॅनर्स असायचे.
शिवसेनेतल्या ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार
शिवसेनेमधल्या अनेक महत्त्वाच्या घटना दसरा मेळाव्यात घडल्या आहेत म्हणून शिवसेनेत दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व आहे.
'ठाकरे विरुद्ध ठाकरे' पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात, "1996 साली राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवउद्योग सुरू करण्यात आला. त्याची घोषणा दसरा मेळाव्यात केली गेली.
1982 साली गिरणी कामगारांच्या संप या संदर्भाने बाळासाहेब ठाकरे यांनी भाषण केलं. त्यावेळी दसरा मेळाव्याला त्यावेळी कॉंग्रेसमध्ये असणार्या शरद पवार आणि जॉर्ज फर्नाडिस यांना आमंत्रित केलं होतं. 2010 साली बाळासाहेब ठाकरे यांनी नातू आदित्य ठाकरे यांच्या हातात तलवार देऊन राजकारणातलं 'लॉंचिग' दसरा मेळाव्यातच केलं होतं."
त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचं पूर्णपणे नेतृत्व हातात घेतलं होतं.
बाळासाहेब ठाकरे यांना वयानुसार सभांना जाणं शक्य होत नव्हतं. 24 ऑक्टोबर 2012 साली झालेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांना तब्येतीच्या कारणामुळे उपस्थित राहता आलं नव्हतं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केलं होतं. दसरा मेळाव्याच्या त्या 'भाषणात' कडक शब्दात टीका करणारे बाळासाहेब हळवे झालेले महाराष्ट्राने पाहीले.
ते म्हणाले होते "तुम्ही मला इतके वर्षं सांभाळलं. आता उद्धवला आणि आदित्यला सांभाळून घ्या आणि महाराष्ट्रात उत्कर्ष घडवा." बाळासाहेब ठाकरे यांचं 2012 मधल्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांसाठी असलेलं ते शेवटचं भाषण ठरलं.
इंदिरा गांधींनी देशात जाहीर केलेल्या आणीबाणीला त्यांनी 1975मध्ये पाठिंबा जाहीर केला तो याच मैदानातून. नंतर 1985मध्ये शिवसेनेची हिंदुत्वाविषयीची भूमिकाही त्यांनी याच मैदानातून जाहीर केली होती.
'जय महाराष्ट्र: हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' हे पुस्तक लिहिणारे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर म्हणतात, "1978च्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेला मोठा पराभव सोसावा लागला. त्यावेळी शिवसेना जिंकेल असं वाटत होतं. त्यानंतर बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत, 'तुमचा (मुंबईकरांचा) माझ्यावर विश्वास नाही, तर मी शिवसेना सोडून जातो,' असं म्हटलं होतं.
त्यानंतर 1985च्या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेनेची पालिकेत स्वबळावर सत्ता आली. त्या नंतरच्या सभेला मी हजर होतो. त्यावेळी कांगा नावाचे कमिशनर होते. कांगांनी जर ऐकलं नाही, तर शिवसैनिकांनी त्यांच्या कानाखाली आवाज काढावा' असं बाळासाहेब त्या सभेत बोलले होते.
1991च्या मेळाव्यात त्यांनी घोषणा केली होती, की कोणत्याही परिस्थिती वानखेडे स्टेडियमवर मुंबईत पाकिस्तानचा सामना होऊन देणार नाही. त्याचं पुढे काय झालं, ते आपल्याला माहितच आहे. नंतर शिशिर शिंदे, प्रभाकर शिंदे आणि शिवसैनिकांनी वानखेडेवर जाऊन पिच खोदलं आणि त्यावर डांबर टाकलं. परिणामी तिथे मॅच होऊ शकली नाही."
2010मध्ये मुंबई हायकोर्टाने शिवाजी पार्कचा समावेश 'सायलेंट झोनमध्ये' केला. शिवसेनेचं मुखपत्रं असणाऱ्या सामनातून बाळासाहेबांनी या निर्णयावर टीका केली होती. अखेर पक्षाला इथे वार्षिक मेळावे घेण्याची परवानगी मिळाली.
शिवसेनेच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांचे शपथविधी शिवाजी पार्कवरच झाले आहेत. 1995 सेना-भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं. तेव्हा मोठा भाऊ असणाऱ्या शिवसेनेला 73 तर भाजपला 65 जागा मिळाल्या होत्या. साहजिकच मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे गेलं आणि मुख्यमंत्रिपदासाठी निवड करण्यात आली मनोहर जोशींची.
सामान्य शिवसैनिकालाही या सोहळ्यात सहभागी होता यावं म्हणून शपथविधी राजभवनावर न करता तेव्हाही शिवाजी पार्कात करण्यात आला होता. लाखो शिवसैनिकांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपाशी मैत्री तोडून कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत 'महाविकास आघाडी' केली. ते स्वत: मुख्यमंत्री झाले. ठाकरेंसह 6 मंत्र्यांनी पहिल्या टप्प्यात शपथ घेतली होती. हा शपथविधी सोहळाही शिवाजी पार्कवरच झाला होता. त्यालाही मोठी गर्दी झाली होती.
ठाकरे कुटुंब आणि शिवाजी पार्क
शिवसेनेच्या स्थापनेपासून ते 56 वर्षांच्या प्रवासापर्यंत सगळं ठाकरे कुटुंबियांवरच केंद्रित झालं आहे. शिवाजी पार्कसोबतही प्रबोधनकार ठाकरेंपासून आदित्य ठाकरेंपर्यंत सगळ्यांच तसं आहे. राज ठाकरेंनीही त्यांच निवासस्थान इथंच ठेवलं आहे आणि त्यांच्या पक्षाची स्थापनाही त्यांनी याच मैदानावरच्या जाहीर सभेनं केली होती.
प्रबोधनकार ठाकरे दादर परिसरामध्ये रहात. दादरमध्येच त्यांनी पहिल्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाला खांडके बिल्डिंगमधून सुरुवात केली होती.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यान याच शिवाजी पार्कात झालेल्या सभांमध्ये प्रबोधनकारांचा सहभाग होता. आता याच शिवाजी पार्कपासून अगदी हाकेच्या अंतरावर संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेलं दालन आहे.
शिवसेनेचा जन्मही शिवाजी पार्क परिसरातला. '77 ए रानडे रोड' या ठाकरेंच्या जुन्या घरातला. 'मार्मिक'चा जन्मही इथलाच. 13 ऑगस्ट 1960ला मार्मिकला सुरुवात झाली.
'द कझिन्स ठाकरे : उद्धव, राज अॅण्ड द शॅडो ऑफ देअर सेनाज' पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार धवल कुलकर्णी म्हणतात, "प्रबोधनकार ठाकरे दादर परिसरातच रहायचे. नंतर बाळासाहेबांचं कुटुंब दादरहून कलानगरला मातोश्रीवर रहायला गेलं. पण श्रीकांत ठाकरे शिवाजी पार्कला रहायचे. आणि बऱ्याचदा उद्धव ठाकरे काका श्रीकांत यांच्यासोबत असायचे. राज आणि बाळासाहेब जसे जवळ होते, तसेच उद्धव आणि श्रीकांत ठाकरे अतिशय जवळ होते.
उद्धव ठाकरेंना असलेला फोटोग्राफीचा छंद हा काका श्रीकांत ठाकरे यांच्याकडून आलेला आहे. बाळासाहेबांचं लग्नही शिवाजी पार्कजवळच्या महाले - जोशी बिल्डिंगमधल्या घरात झालं होतं. आणि सगळ्याच ठाकरे भावंडाचं, उद्धव ठाकरेंचंही शिक्षण शिवाजी पार्क परिसरातल्या बालमोहन शाळेत झालेलं आहे. हा परिसर आणि ठाकरे यांचं इतकं जवळचं नातं आहे."
बाळासाहेबांच्या निधनानंतर लाखो शिवसैनिकांनी साश्रूनयनांची याच मैदानात त्यांना निरोप दिला. बाळासाहेबांवर जिथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्या शिवाजी पार्कच्या एका भागामध्ये आज त्यांचं स्मृतीस्थळ आहे. शिवाजी पार्कपासून अगदी जवळ असणाऱ्या महापौर बंगल्यामध्ये आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक होणार आहे. बाळासाहेबांच्या पत्नी - मीनाताई ठाकरे, ज्यांना 'मां' म्हटलं जायचं त्यांचाही पुतळा या शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वारापाशी आहे.
जेव्हा दसरा मेळावा रद्द झाला होता
शिवसेनेच्या इतिहासात आतापर्यंत दोनवेळा दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. 2006 साली मुंबईत जोरदार पाऊस पडत होता. शिवाजी पार्कवर चिखल झाला होता काही ठिकाणी पाणी साचलं होतं. यामुळे दसरा मेळावा रद्द करावा लागला होता. 2009 साली विधानसभा निवडणुका लागल्या होत्या. आचारसंहितेच्या काळात दसरा मेळावा घेणं शक्य नव्हतं तेव्हा तो पुढे ढकलण्यात आला होता.
पण या वर्षी दसरा मेळावा नक्की कुठं होणार हा प्रश्न आहे. सध्या चेंडू मुंबई महापालिकेच्या कोर्टात आहे. त्यांना निर्णय घ्यायचाय की परवानगी कोणाला द्यायची, उद्धव ठाकरेंना की एकनाथ शिंदेंना. निर्णय घेतला तर एका कोणाला तरी नवी जागा मेळाव्यासाठी शोधावी लागेल.
पण एका पक्षाच्या दोन गटांमध्ये न अडकता पालिकेनं कोणालाच परवानगी दिली नाही तर कुठलाही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होण्याची शक्यता मावळेल. दोघांनीही आपलाच मेळावा तिथं होईल असे दावे केले आहेत. दसऱ्यालाच समजेल की परंपरेच्या सुसंगत काय होणार आणि विसंगत काय होणार.