गानसम्राज्ञी स्वर कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज सकाळी निधन झालं. त्या 93 वर्षांच्या होत्या. 8 जानेवारीपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लतादीदींचं पार्थिव 12.15 ते 12.30 वाजण्याच्या दरम्यान ब्रिच कँडी रुग्णालयातून 'प्रभू कुंज' या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले आहे. तिथून मग संध्याकाळी 4 ते 6 वाजण्याच्या दरम्यान दादर येथील शिवाजी पार्क इथं अंत्यसंस्कार केले जातील.
लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "लतादीदींचं अंत्यदर्शन घेण्यासाठी स्वत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही मुंबईत पोहोचणार आहेत."
फडणवीस म्हणाले, "लतादीदींनी अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गाणी म्हणण्याचा विक्रम नोंदवला. सगळ्या भाषांमध्ये त्यांची गाणी प्रसिद्ध होती. अनेक दशकं प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालणारा हा आवाज अशा प्रकारे शांत होईल असं आम्हाला वाटलंच नव्हतं. लता दीदींचा आवाज अजरामर आहे. शतकानुशतकं तो आवाज आम्हा सर्वाना प्रेरणा देत राहील."
"लता दीदी या उत्तम गायिका तर होत्याच, पण व्यक्ती म्हणूनही त्या अतिशय संवेदनशील होत्या. विशेषत: प्रचंड राष्ट्रभक्त असं कुटुंब आहे. लता दीदी राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर असीम श्रद्धा लतादीदींची होती. कुठल्याही राष्ट्रकार्यात आपलंही समर्पण असलं पाहिजे, अशा प्रकारच्या भावनेनं त्या जीवनभर कार्यरत होत्या," असं फडणवीस म्हणाले.
त्यांच्यावर शासकीय इतमामात मुंबईच्या शिवाजी पार्क येथे संध्याकाळी 6:30अंत्यसंस्कार करण्यात येतील.