Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सायन रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल, आधी डॉक्टर आणि दोन कर्मचारी निलंबित

webdunia
सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (16:04 IST)
मुंबई येथील सायन रुग्णालयात दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याप्रकरणी रविवारी रात्री  दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले होते. तर आता पुन्हा आणखी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. शवागारातील २ कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. अशा चुकांचे महानगरपालिका प्रशासन मुळीच समर्थन करीत नसून या दुर्दैवी प्रकारात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दरम्यान, मृत व्यक्तिचे शवविच्छेदन करताना किडनी काढण्यात आल्याचा आरोप चुकीचा असून प्रशासन तो स्पष्टपणे नाकारत आहे, असा खुलासा मुंबई महापालिकेने केला आहे.
 
सायन येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात अंकुश सुरवडे (२६) याला २८ ऑगस्ट रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. एका अपघातात जबर जखमी झाल्याने अंकुश सुरवडे याच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला जीवरक्षक प्रणालीसह उपचार पुरवण्यात येते होते. दुर्दैवाने अंकुशचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
 
दरम्यान, शीव रुग्णालयातच हेमंत दिगंबर यांना शनिवार, १२ सप्टेंबर रोजी मृतावस्थेतच त्यांच्या नातेवाईकांनी आणले होते. अंकुश व हेमंत या दोन्ही रुग्णांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात राखण्यात आले होते.
 
हेमंत यांचे नातेवाईक रुग्णालयात आले. त्यांनी अंकुश यांचा मृतदेह हा हेमंत यांचा असल्याचे ओळखून सर्व प्रक्रिया पार पाडून पोलीसांच्या स्वाक्षरीनंतर नेला. प्रत्यक्षात अंकुश यांचा मृतदेह हा हेमंत यांचा असल्याचे समजून हेमंत यांच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला. हेमंत यांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर अंत्यसंस्काराचे विधीदेखील पार पाडले, असं पालिकने स्पष्ट केलं.
 
त्यानंतर अंकुशचे नातेवाईक रुग्णालयात आले व त्यांनी शव ताब्यात देण्याची विनंती केल्यानंतर ही चूक घडल्याचे लक्षात आले.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन : कोरोना लशीची भीती दूर करण्यासाठी पहिला डोस मीच घेईन