ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेत दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे. या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीया प्रकरणाची लवकर सुनावणी केली जाईल आणि विशेष सरकारी वकील नियुक्त केला जाईल तसेच आरोपीच्या विरोधात बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे.
या प्रकरणी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा आणि पीडित मुलींच्या कुटुंबाला लवकर न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. महायुतीवर निशाणा साधत ते म्हणाले, एकीकडे सरकार बहिणींसाठी मुख्यमंत्री कन्या योजना राबवत आहे आणि राज्यात महिला आणि मुली सुरक्षित नाही.
ते म्हणाले, अशी घटना राज्यातच नाही तर देशाच्या कुठल्याही भागात घडू नये या साठी विधेयक यायला पाहिजे. राज्यात आम्ही शक्ती विधेयक मंजूर करणार होतो.मात्र आमचे सरकार पाडण्यात आले. आताच्या राज्य सरकारने शक्ती विधेयक मंजूर करून घेण्याची आणि कठोर कारवाई करण्याची जबाबदारी घ्यावी.
बदलापूरमधील नामांकित शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडली. वय 4 आणि 6 वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची ही घटना घडलीय. या दोन्ही चिमुकल्या मुली लघुशंकेसाठी जात असताना, शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने त्या दोघींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मला या प्रकरणी राजकारण करायचे नाही, त्यामुळे जो कोणी दोषी असेल, मग तो कोणी असो त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोलकाता येथील महिला डॉक्टरांवरील अत्याचाराच्या प्रकरणाचा संदर्भ देत शिवसेना (यूबीटी) प्रमुख म्हणाले की, काही राज्यांना लक्ष्य करून महिलांवरील गुन्ह्यांवर राजकारण केले जात आहे.
या घटनेनंतर पालकांनी तीव्र आंदोलन केले आणि मंगळवारी बदलापूर स्थानकात रुळांवर उतरून लोकल थांबवल्या.