मुंबईकरांना उन्हासोबत आता पाण्याच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. कारण दोन दिवस मुंबईचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. यावेळी पाणी कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे बोरिवली (पश्चिम) परिसरातील 'आर मध्य' विभाग परिसरातील ऑरा हॉटेल समोरील लिंक रोडच्या पूर्वेकडील बाजूस 1500 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (वल्लभ नगर आउटलेट) वळवण्याचे काम गुरुवार (5 मे) रात्री 11.55 वाजल्यापासून शुक्रवार (6 मे) रात्री 11.55 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत म्हणजेच गुरुवारी रात्री 11.55 ते शुक्रवारी रात्री 11.55 पर्यंत 'आर मध्य' आणि 'आर उत्तर' विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
आर मध्य विभाग : चारकोप, गोराई, एक्सर, शिंपोली, वझिरा व संपूर्ण बोरिवली (पश्चिम) विभाग - (सायंकाळी 7.10 ते रात्री 9.40 आणि सकाळी 11.50 ते दुपारी 1.50 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र कामामुळे 6 मे रोजी कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
आर उत्तर विभाग : एलआयसी वसाहत, एक्सर गाव, दहिसर गांव, कांदरपाडा, लिंक रोड व संपूर्ण दहिसर (पश्चिम) विभाग - (रात्री 9.40 ते रात्री 11.55 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र 6 मे रोजी कामादरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
सर्व संबंधीत विभागातील नागरिकांना या कालावधीतील पाणीकपात पूर्वी अगोदरच्या दिवशी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.