ठाणे : अतिशय दुर्मिळ समजली जाणारी व्हेल माशाची वांती/उलटी बेकायदेशीररित्या स्वत:जवळ बाळगून ती विक्रीसाठी आलेल्या एका दुकलीच्या श्रीनगर पोलिसांनी मुसक्या आवळ्या आहेत. त्यांच्याकडून दोन कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या दोघांना येत्या १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात दोघेजण व्हेल माशाची उलटी हे अनिधकृतरित्या जवळ बाळगून विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळताच सापळा रचून चारकोप, कांदिवलीच्या मयुर देवीदास मोरे (३१) आणि अहमदनगर, जामखेडच्या प्रदिप अण्णा मोरे (३४) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यांच्याकडील बॅगमध्ये असलेल्या प्लास्टीकच्या पिशवीमध्ये पिवळसर तांबट रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे दगड सदृष्य वस्तु आढळून आल्या. त्याचे सुमारे ०२.०४८ कि. ग्रॅम वजन असून ती वस्तू ही व्हेल माशाची वांती/उलटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.त्यातही ती उलटी मध्यस्थीच्या मदतीने २ कोटी रुपयांना विक्रीसाठी घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले. त्या व्हेल माशाच्या उलटीसह दोन मोबाईल फोन आणि मोटारसायकल असा दोन कोटी २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
काय आहे अंबरग्रीस? व्हेल माशाच्या उलटीतून तयार होणाऱ्या दगडास अंबरग्रीस असे म्हटले जाते. अंबरग्रीसचा लहानसा खडाही शर्टावर चोळल्यास त्यातून निघणारा सुगंध महिनाभर टिकतो. परदेशातील सिगारेटमध्येही सुंगधासाठी अंबरग्रीसचा वापर होतो. त्यामुळे परदेशात अंबरग्रीसला मोठी मागणी आहे. गेल्या काही वर्षांपासून या अंबरग्रीसच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे.