उत्तर भारतीयांविरोधात पुन्हा एकदा विखारी भाषण केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी समाजवादी पक्षाच्या खासदारांनी आज राज्यसभेत गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज एका तासासाठी स्थगित करण्यात आले आहे.
राज्यसभेच्या कामकाजाला सुरवात झाल्यानंतर लगेचच समाजवादी पक्षाचे खासदार उभे राहिले आणि त्यांनी राज ठाकरे यांच्यविरोधात घोषणाबाजी करायला सुरवात केली. त्यावेळी अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी तबलावादक पंडित किशन महाराज व म्यानमारमधील वादळात मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहायची आहे, याची आठवण या खासदारांना करून दिली. श्रद्धांजली वाहेपर्यंत हा गोंधळ थांबला. पण त्यानंतर समाजवादी पक्षाचे सदस्य शाहिद सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या मुद्यावर आक्रमक झाले आणि सभागृहाच्या वेलमध्ये आले.
राज ठाकरे यांना अटक करून घटनेचे संरक्षण करावे अशा आशयाची घोषणाबाजी त्यांनी सुरू केली. अन्सारी यांनी या सदस्यांना त्यांच्या जागेवर बसण्याची विनंती केली. पण तरीही ते ऐकत नव्हते. अखेर अन्सारींनी सभागृह एका तासासाठी स्थगित केले.