Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'आमार बांगला, शोनार बांगला'

- राजदीप मित्रा

'आमार बांगला, शोनार बांगला'
ND
ND
मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी मैदानात उतरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बिहारी व युपीच्या लोकांना लक्ष्य करीत आहेत. त्याचवेळी बंगालच्या लोकांनी बंगाली भाषा, संस्कृती कशी टिकवली याचेही धडे देत आहेत. सत्यजित राय व रवींद्रनाथ टागोर यांचे उदाहरण देऊन या दोघांनीही त्यांच्या सृजनाचा अविष्कार बंगालीत केला, तरीही ते 'ग्लोबल' झाले याचा उल्लेख राज यांच्या भाषणात येतो आहे. या अनुषंगाने बंगालमधील परिस्थिती जाणून घेऊया.

मुंबई आणि कोलकता ही महानगरे जवळपास एकसारखी वैशिष्ट्ये बाळगून आहेत. त्याचवेळी या दोन्ही राज्यांची काही स्वभाववैशिष्ट्येही सारखी आहेत. दोन्ही समाजात बुद्धिवादी लोक मोठ्या प्रमाणात आहेत. स्वातंत्र्य संग्रामात बंगाल आणि महाराष्ट्र या प्रांतातील लोक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. व्यावहारिकतेपेक्षा वैचारीक क्षेत्रात दोन्ही प्रांतीय लोकांचे योगदान जास्त आहे. विचारवंतांची मोठी परंपरा दोन्ही राज्यांना लाभली आहे. आचारातील पुरोगामित्व दोन्हीकडे दिसून येते. त्याचवेळी धंदेवाईकपणाचा अभावही आहे. म्हणूनच 'उत्तम' शेती व 'मध्यम' नोकरी हीच दोन्ही प्रांतीयांची मानसिकता आहे.

सांस्कृतिक दृष्ट्याही दोन्ही प्रांत श्रीमंत आहेत. साहित्याचे वेडही त्यांना आहे. साहित्याची लेणी दोन्ही भाषांत निर्माण झाली. चित्रपट, नाटक, संगीत अशा सृजनोविष्कारातही हे प्रांत आघाडीवर आहेत. बंगालमध्ये दुर्गापूजा व महाराष्ट्रात गणेशोत्सवासारखे सण ही त्या प्रांताची ओळख बनले आहेत.

हे सगळे असतानाही सद्यस्थितीतील काही मुद्दे मुंबईप्रमाणेच कोलकत्यालाही लागू पडतात. मुंबईत जसे परप्रांतीय मोठ्या प्रमाणात येत आहेत, तसेच कोलकत्यातही तेच घडते आहे. पण तरीही बंगालमध्ये मुंबईसारखा प्रश्न आज तरी उद्भवलेला नाही. परप्रांतीयांविषयी लोकांच्या मनात नाराजी नाही, असे नाही. पण येणाऱ्या लोकांचा प्रभाव इतकाही पडलेला नाही की बंगाली गुदमरते आहे. याची बरीच कारणे आहेत. ती आपण पाहूया.

बंगालला लागून बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओरीसा शिवाय आसाम आणि पूर्वेकडील राज्ये लागून आहेत. याशिवाय बांगलादेशही लागून आहे. हे सगळे प्रदेश अविकसित आहेत. म्हणून त्या तुलनेत विकसित असलेल्या कोलकत्यात ही मंडळी धाव घेतात. एवढेच नव्हे तर बांगलादेशातील लोकही मोठ्या प्रमाणात घुसखोरी करून कोलकत्यात आरामात जगत आहेत. बिहारी, युपीचे लोक भाषेवरून ओळखू येतात. पण बांगलादेशचे लोक स्थानिक बंगाली लोकांसारखेच दिसतात, रहातात आणि बोलतातही. त्यामुळे ते वेगळे आहेत, असे कळत नाही. एकूणात कोलकत्यातही मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आहेत.

असे असले तरी कोलकत्यात परप्रांतीयांचे वर्चस्व नाही. कोलकत्यात हिंदी मोठ्या प्रमाणात बोलली जाते हे खरे असले तरी बंगाली न शिकता चालू शकते, असे मात्र नाही. बंगाली लोक आग्रहपूर्वक बंगालीतच बोलतात. मुळात त्यासाठी फतवा वगैरे काढण्याची गरज पडत नाही. मात्र, बंगालीच्या चलनाला इतरही काही कारणे आहेत. बंगाली ही एक समृद्ध भाषा आहे. यात अक्षय असे साहित्य निर्माण झाले आहे.

webdunia
ND
ND
रवींद्रनाथ, बंकिमचंद्र, शरदचंद्र, जीवनानंद दास, मायकल मधुसूदन, सुकांत भट्टाचार्य (सध्याचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे काका. स्वतः बुद्धदेवही साहित्यिक आहेत. शिवाय व्यासंगीही), सुनीलकुमार गांगुली अशी थोर व ख्यातनाम साहित्यिकांची मोठी परंपरा बंगालीत आहे. या साहित्याचा प्रभाव पूर्ण भारतावर पडला आहे. रवींद्रनाथांना नोबेल मिळाले हे तर विख्यात आहेच. त्यामुळे एकेकाळी तर देशातील अनेक मान्यवर लोक बंगाली शिकणे अभिमानाचे मानत. अगदी आजही परप्रांतातून येणाऱ्या समाजाच्या उच्च स्तरातील व्यक्तीला बंगाली शिकणे हा अभिमानाची बाब वाटते. बंगालीतील उच्च दर्जाचे साहित्य आपल्याला वाचता येईल हा आनंद त्यात असतोच, पण या थोर साहित्यपरंपरेच्या आस्वादकांत आपण सामील झालो याचाही एक अभिमान तयार होतो. म्हणूनच क्रिकेटपटू अरूण लाल, अशोक मल्होत्रा ही मंडळी बाहेरून कोलकत्यात आली, पण ती चांगली बंगाली बोलतात.

त्याचवेळी समाजातील खालच्या स्तरातील परप्रांतीय जे किरकोळ नोकरी धंद्यासाठी बंगालमध्ये येतात, त्यांना फार काळ हिंदीत बोलून चालत नाही. कारण स्थानिक बंगाली लोक स्वभाषेसाठी आग्रही असल्याने ते हिंदी लोकांशी जास्त व्यवहार करण्याच्या भानगडीत पडत नाही. शिवाय लिपी वेगळी असल्याचाही परिणाम असेल, पण सर्वसामान्य बंगाली माणसालाही हिंदी इतकी चांगली कळत नाही. बोलणे तर दूरच. मग त्याच्याशी संपर्क साधायला बाहेरच्या माणसाला बंगाली शिकावीच लागते. कारण त्याला त्या भाषिक लोकांशी व्यवसाय करायचा असतो.

कलाक्षेत्रात बंगाली लोकांचे योगदान फार मोठे आहे. हिंदीतही ते आहे. अगदी बिमल रॉय, मृणाल सेन, ऋत्विक घटक, बर्मन पितापुत्र, अनिल विश्वास, सलील चौधरी, मन्ना डे, किशोर कुमार अशी किती नावे घ्यावीत. या मंडळींनी काम हिंदीत केले तरी बंगाली ही ओळख जपली. कारण ते बंगाली चित्रपटांशीही जोडले गेले होते. म्हणूनच बॉलीवूडच्या अनेक कलावंतांनी बंगालीत काम केले. बंगालीतील गुणवंतांचा प्रवाह अजूनही सुरू आहे. राणी मुखर्जी, बिपाशा बासू, विद्या बालसंगीतकार प्रीतम, गायक शान असे अनेक बंगाली कलावंत हिंदीत कार्यरत आहेत. या एकूणच समृद्ध परंपरेमुळे बंगाली लोकांकडे पहाण्याचा बॉलीवूडचा दृष्टिकोनही आदराचा आहे. याशिवाय सत्यजित राय, ऋतुपर्ण घोष, अपर्णा सेन हे दिग्दर्शकही बंगालीत काम करूनही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावून आहेत. त्यामुळे त्यांच्या चित्रपटात काम करणे ही बाब बॉलीवूडच्या कलावंतांसाठी अभिमानस्पद ठरते.

महाराष्ट्रात सृजनशील मराठी कलावंत असूनही त्यांच्या कलाकृतींना रसिकमान्यता मिळत नसल्याचे ऐकिवात येते. पण बंगालीत तसे घडत नाही. बंगाली चित्रपट आजही मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. बंगाली चित्रपटांवर चालणारी अनेक सिने साप्ताहिकेही आहेत. बंगाली गाणी आजही मोठ्या प्रमाणात ऐकली जातात. शिवाय रवींद्र संगीत, नजरूल संगीत यांची अत्यंत अभिमानस्पद अशी परंपरा आहे. त्याचवेळी बंगाली अस्मितेचा तो भाग आहे.

हे सगळे झाले, भाषा आणि संस्कृतीबद्दल. याचा अर्थ येणार्‍या परप्रांतीय लोंढ्यांबद्दल सामान्य बंगाली लोकांत अस्वस्थता नाही, असे नाही. ही नाराजी असली तरी ती कुठेही जाहिररित्या प्रकट झालेली नाही. पण त्याचवेळी त्यांचे आमची संस्कृती, भाषा यावर अतिक्रमण होत असेल तर ते रोखायला हवे ही आंतरीक भावनाही त्यात आहे. म्हणूनच की काय बंगाली माणूस आपल्या भाषेला आणि संस्कृतीला चिकटून असतो. त्यामुळे परप्रांतीयांना बंगालींवर वर्चस्व गाजविता येत नाही. परप्रांतीयांची आपल्या भाषेची पॉकेट्स तयार होत असली तरी बाह्य जगात त्यांना बंगालीत व्यवहार केल्याशिवाय चालत नाही. मुंबईत नेमके हेच घडत नसावे.

छटपूजा वगैरे प्रकार कोलकत्यातही होतात. पण त्याचे प्रमाण कमी असते. त्याला स्थानिक पक्षांचे लोक जातात. पण त्याचा हेतू आपली 'व्होट बॅंक' जपणे हेच असते. बाहेरून येथे येऊन बिहारी किंवा युपीचे नेते राजकीय वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाहीत. कारण ते शक्य नाही, याची त्यांना जाणीव असते. कारण समग्र बंगाली लोकांशी ते कोणत्याही प्रकारे जोडले जाऊ शकणार नाहीत. म्हणूनच कदाचित परप्रांतीयांचे राजकीय वर्चस्व तयार होऊ शकलेले नाही.

मुंबई व महाराष्ट्राप्रमाणे दुकानांवर इंग्रजीत बोर्ड कोलकत्यातही दिसतात. पण त्याविरोधात नाराजीही आहे. ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार गांगुली यांनी या विरोधात आंदोलन छेडले होते. त्याला प्रतिसादही मिळाला आणि बर्‍याच प्रमाणात आता बंगालीतही बोर्ड दिसू लागले आहेत. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्याही त्यांच्या जाहिराती बंगालीत करतात. त्यांची होर्डिंग्ज बंगाली भाषेतच लावतात. शाळेतही बर्‍याच प्रमाणात बंगाली भाषा अनिवार्य आहे. सीबीएसई, आयसीएसईच्या शाळाही बंगाली भाषा शिकवतात.

भाषा टिकवायसाठी तिचा मुळात अभिमान हवा. नुसता अभिमान असून चालणार नाही, तिचा वापरही आवर्जून करायला हवा. आपल्या भाषेतील लोकांशी मातृभाषेतच बोलायला हवे. त्या राज्यात रहाणार्‍या परप्रांतीयालाही ती भाषा शिकावी अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी. तरच परप्रांतीयांना स्थानिक भाषेचे महत्त्व वाटेल. शिवाय स्वभाषिक साहित्य, कला, चित्रपटत नाटक आदींचा आस्वाद घ्यायला हवा. तरच भाषा टिकेल. अन्यथा जागतिकीकरणाच्या काळात सांस्कृतिक सपाटीकरण होऊन प्रादेशिक भाषा भुईसपाट होऊन जातील आणि मग आपणच आपली ओळख हरवून बसू.

(शब्दांकनः अभिनय कुलकर्णी)

( लेखक बंगालीतील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Share this Story:

Follow Webdunia marathi