मुंबईत उत्तर भारतीयांना विशेषतः युपी व बिहारींविरोधातील नाराजीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उघड व्यक्त केले. पण ज्या बिहारी व युपीविरोधात ही नाराजी व्यक्त केली जाते आहे, त्यातील बिहारी लोकांना मुंबई किंवा महाराष्ट्रात येण्याची गरज का पडते हे जाणून घेण्याची गरज आहे.
भारतातील अतिशय अविकसित राज्यांमध्ये बिहार येते, एवढेच आपल्याला माहिती असते. शिवाय नरक या शब्दाला प्रतिशब्द म्हणूनही अनेकदा बिहारचे नाव अनेक विनोदांमध्ये येत असते. तेथील राज्यकर्ते विशेषतः लालूंचा भरपूर विनोदात वापर केला जातो. तेथील बिहारी लोकांचे बोलणे हाही अनेकांच्या नकलीचा भाग असतो. पण त्याचवेळी आयआयटी, आयएएसमध्ये बिहारची मुले सर्वांत जास्त असतात. हीच मुले पुढे विकसित राज्यांत नोकरीसाठी जातात. प्रशासकीय सेवेत बिहारची मुले सर्वांत जास्त असूनही स्वतःच्या राज्याला ती का सुधारू शकत नाहीत, असा प्रश्न आपल्याला पडतो. पण हे सोडले तर बाकीच्या शिक्षणात बिहारींचे नाव कुठेही येत नाही. काय आहे, तेथील शिक्षण व्यवस्था?
बिहारमध्ये दहावीची परीक्षा द्यायची असेल तर ती देण्याची सोय फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे जिल्ह्यापासून राहण्याचे ठिकाण कितीही लांब असले तरी केवळ परीक्षेसाठी हजारो मुले दहा ते पंधरा दिवसांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येतात. तिथे खोल्या घेऊन एकत्र राहतात आणि परीक्षा देतात.
परीक्षा दिल्यानंतर शिकायची इच्छा असल्यास गाव सोडण्याशिवाय पर्यायच नसतो. तालुका पातळीवर अत्यंत कमी कॉलेजेस आहेत. प्रामुख्याने कॉलेजेस जिल्हा पातळीवर आहेत. त्यातही प्रमुख शाखा सोडल्यास इतर शाखांची बोंबच आहे. आर्किटेक्चर, कला अशा विषयांचे शिक्षण घेण्याची सुविधा जवळपास नाही.
बिहारमधील पाटणा, समस्तीपूर, मुझफ्फरपूर, दरभंगा, बरौनी हे शहरे सोडली तर इतर ठिकाणी शिक्षणाची फारशी सुविधा नाही. त्यामुळे दहावी झाल्यानंतर पुढे शिक्षणासाठी घर सोडावेच लागते. पुढे पदवी घेतल्यानंतर इतर व्यावसायिक शिक्षण नसल्याने समोर स्पर्धा परीक्षांचे एकमेव लक्ष्य असते. त्याच्या तयारीसाठी दिल्ली किंवा इतर शहरे गाठली जातात.
जे अल्पशिक्षित असतात त्यांना शेतीत काम करण्याशिवाय गत्यंतर नसते. पण तिथेही पुराचा मोठा फटका बसतो. पठारी प्रदेश असल्याने शेतीत पुराचे पाणी शिरते. सगळे पीक वाया जाते. दरवर्षीच पुराचा फटका या राज्याला बसतो. त्यामुळे जमिनी असूनही त्याचा उपयोग नाही. त्यामुळे लोक मजुरीसाठी बाहेर पडतात. हे मजूर फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रात येतात, असे नाही. ते इतरही राज्यात जातात. पंजाबमध्येही बिहारी मोठ्या प्रमाणात आहेत. जालंधरमध्ये रिक्षा व्यवसाय त्यांच्या हातात आहे. पंजाबमध्ये शेतीत मजूर म्हणून हे लोक मोठ्या प्रमाणात काही महिन्यांसाठी येतात. त्यांचे येणे बंद केले तर या राज्यातील शेतीची कामेच होणार नाहीत, अशी स्थिती आहे. दिल्लीत तर बिहारी आहेतच. पण शेजारच्या पश्चिम बंगालमध्ये विशेषतः कोलकात्यात मोठ्या प्रमाणात बिहारी आहेत. मध्य प्रदेशातही त्यांचा शिरकाव आहे. पण या सर्वांपेक्षा मुंबई त्यांना परवडते. कारण त्या तुलनेत पैसा जास्त मिळतो. आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळते.
बिहारमध्ये औद्योगिकीकरण जवळपास नाही. किरकोळ केंद्राचे कारखाने सोडले तर बाकी कुठेही कारखाने नाहीत. परिणामी नोकरी कशी मिळेल? त्यामुळे शिकल्यानंतर शहर आणि त्याहीपेक्षा जास्त म्हणजे राज्य सोडावे लागते. स्वाभाविकच संधी जिथे मिळते तिथे ही मंडळी जातात. जातीपातींचा प्रभाव आजही या राज्यावर आहे. विशेषतः ग्रामीण भागात तर जात प्रकर्षाने जाणवते. माझे घर सीतामढी जिल्ह्यात आहे. हा जिल्हा नेपाळला लागून आहे. त्याच्या घरासमोर एका खालच्या जातीतल्या माणसाने घर बांधले आहे. पण हा माणूस आमच्या घरी आला की मालक बसू का असे विचारतो. आम्ही त्याला असे करू नको सांगितले तरी तो तसे बोलणे काही सोडत नाही.पण त्याचवेळी इतर भागात कर्मठ जातीव्यवस्था आहे.
या राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतरित झाल्याने जमिनी पडीक आहेत. त्यात काहीही पिकवले जात नाही. मध्यंतरी तेथील राज्य सरकारने या जमिनी ताब्यात घेऊन त्या वाटून देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी मुले नोकरीसाठी इतरत्र गेल्याने घरी फक्त म्हातारे आई-वडील असल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे या सार्या बाबींशीही स्थलांतराचा संबंध आहे.
मी तर असेही ऐकले आहे, की शिकलेली मंडळी बिहार सोडून बाहेरच लग्न करतात. कारण तिथे राहिले तर तिथला एखादा श्रीमंत मुलीचा बाप गुंडांच्या मदतीने त्या मुलाचे अपहरण करतो आणि त्याच्याशी मुलीचा विवाह लावतो. नंतर मुलाकडून त्या मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न जरी झाला तरी तो गुंड तिची काळजी घेण्यास समर्थ असतो. त्यामुळे ही मंडळी बाहेर गेल्यानंतर परत आपल्या राज्यात जात नाहीत.
बिहारच्या एका भागात म्हणजे युपीला लागून असलेल्या भागात गुंडाराज आहे. तर दुसरीकडे माओवाद्यांची चळवळ आहे. बाकीच्या ठिकाणी जमीनदारांच्या विविध सेना आहेत. बाकी उरल्या सुरल्या बिहारचे अराजक करायला तिथले राजकारणी समर्थ आहेत. असे असल्यास बिहारची स्थिती कशी सुधारेल? तिथले लोक स्थलांतर का करणार नाहीत?