Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संघाचा अडवानींना पुन्हा निवृत्तीचा सल्ला!

संघाचा अडवानींना पुन्हा निवृत्तीचा सल्ला!
PR
भाजपमधील पेचप्रसंग सोडविण्यात आपली काहीच भूमिका नाही हे स्पष्ट करतानाच भाजपच्या दैनंदिन कामकाजात संघ कोणताही थेट हस्तक्षेप करण्यास इच्छुक नाही, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज येथे स्पष्ट केले. मात्र, भाजपने सर्वोच्च नेतृत्वासाठी वयाची अट घालून घ्यावी असा सल्ला देताना लालकृष्ण अडवानी यांनी आता निवृत्त व्हावे हेही भागवतांनी अप्रत्यक्षपणे सुचविले.

भाजपमधील अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर श्री. भागवत यांची दिल्लीतील पहिलीच पत्रकार परिषद आज संघटनेच्या 'केशव कुंज' या कार्यालयात पार पडली. तीत भाजपमधील यादवीबाबत भागवत काही बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी अत्यंत सावधगिरीने काठाकाठावरूनच प्रश्नांची उत्तरे दिली.

'संघ भाजपच्या कामकाजात हस्तक्षेप करत नाही. कामकाज करण्याची भाजपची स्वतःची यंत्रणा आहे. पण पक्षाने सल्ला मागितल्यास मात्र तो देण्यास संघ तयार आहे, असे भागवत म्हणाले. अर्थात, कोणताही सल्ला आपणहून देण्यास आम्ही उत्सुक नसतो. सल्ला देणे हे काही संघाचे काम नाही, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

कंदाहार प्रकरणाच्या वादाबद्दलही मतप्रदर्शन करण्याचे त्यांनी टाळले.

संघाने आता भाजपमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज आहे, या ज्येष्ठ पत्रकार आणि नेते अरूण शौरी यांच्या मताबद्दल विचारले असता, श्री. शौरी हे अतिशय आदरणीय आणि ज्येष्ठ विचारवंत आहेत. त्यांनी इतरांविषयी काय मतप्रदर्शन केले त्यावर मी माझे मत मांडू इच्छित नाही. पण पक्षाला चर्चा कराविशी वाटत असल्यास संघ नेहमीच त्यांच्या मदतीला धावून जाईल, असे भागवतांनी स्पष्ट केले.

अडवानींनी आता निवृत्ती स्वीकारावी काय या प्रश्नावर थेट उत्तर न देता, भाजपने आता सर्वोच्च नेतृत्वासाठी वयाची मर्यादा घालून घ्यायला हवी. ५५ ते ६० हे संघाचे सर्वोच्च पदासाठीचे सरासरी वय आहे. भाजपसाठी ही मर्यादा कोणती असावी हे त्यांनी ठरवायचे आहे, असे सांगत त्यांनी नेतृत्वबदलाचा चेंडू भाजपच्या कोर्टात ढकलला.

तत्‍पूर्वी, गुरुवारी भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह आणि पक्षाचे ज्‍येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी भागवत यांची वेगवेगळी भेट घेतली. शुक्रवारी सकाळी भाजपा खासदार वरुण गांधी आणि पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावड़ेकर यांनीही त्यांची भेट घेतली.

भाजपच्या शिमल्यातील चिंतन बैठकीपूर्वी भागवत यांनी एका मुलाखतीत, भाजपमध्ये बेशिस्त वाढली आहे आणि त्यासाठी युवा नेतृत्व या पक्षात येणे गरजेचे असल्याचे मत मांडले होते. परंतु, त्यानंतर राजनाथ सिंह यांनी अडवानी हेच भाजपचे नेते म्हणून यापुढेही रहातील, असे स्पष्ट केले होते. तसा ठरावही या चिंतन बैठकीत मंजूर झाला होता. मात्र, जसवंतसिंह यांच्या हकालपट्टीने सगळीच गणिते बिघडली.

जसवंतसिहांपाठोपाठ अरूण शौरी, यशवंत सिन्हा, सुधींद्र कुलकर्णी, उत्तरांचलचे माजी मुख्यमंत्री खंडुरी, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांनी अडवानींवर हल्ला चढविला. त्यामुळे आता खुद्द अडवानी आणि राजनाथसिंह यांचेच स्थान आता धोक्यात आले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी संघच काही मदत करू शकेल, अशी भाजपमधील नेत्यांची आता भावना झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi