Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता फक्त पाच वर्षे

आता फक्त पाच वर्षे
, मंगळवार, 28 जुलै 2015 (14:55 IST)
नेहरू जसे मुलांचे चाचा आणि देशाचे भाग्यविधाते पंतप्रधान होते. तसे एपीजे अब्दुल कलाम मुलांचे दुसरे चाचा आणि देशाचे भाग्यविधाते राष्ट्रपती होते.

एपीजे अब्दुल कलाम मिसाईल मॅन होते. त्याहीपेक्षा त्यांनी देशाला आणि उद्याच्या पिढीला नवे अग्निपंख दिले.

20-20 मध्ये रमणार्‍या पिढीला त्यांनी 20-20 चे स्वप्न दिले. उद्याचा भारत घडवण्यासाठी, देशाला महासत्ता बनवण्यासाठी, कलाम म्हणत असत, ‘स्वप्नं खरी होण्याआधी स्वप्नं पाहायला लागतात. कधी हार मानू नका. संकटांना आपल्यावर कुरघोडी करू देऊ नका. मोठी स्वप्ने पाहा, मोठे व्हा, अन् देशही मोठा करा.’

स्वत:बरोबर देशालाही मोठे करण्याचे स्वप्न उद्याच्या पिढीत पेरणारे कलाम चाचा खरे भारतरत्न होते.

ही पिढी खरेच भाग्यवान ज्यांना कलाम चाचा पाहता आले. कलाम चाचांना पाहत मोठी होणारी ही पिढी.

तुमचा आवडता नेता कोण? असे कोणत्याही लहान मुलांना विचारले की, ते एकच नाव सांगत, एपीजे अब्दुल कलाम. मुलांना राष्ट्रपतींची नावे विचारा ते पहिले नाव घेतील एपीजे अब्दुल कलामांचे.

निहायत साधेपणा हे त्यांचे वैशिष्टय़. मोठी माणसे खरंच खूप साधी असतात.

देशाच्या सगळ्या नद्यांचे, दोन्ही बाजूच्या समुद्राचे तीर्थसार ज्या रामेश्वरमला एकवटते त्या रामेश्वरमचे होते कलाम. देशाच्या मिश्र संस्कृतीचे ते मूर्तिमंत प्रतीक होते. त्यांनी लग्न केले नव्हते म्हणून त्यांना मुलं-बाळं नव्हती. पण त्यांच्यामागे या देशाची सारी मुले आहेत.

2020 उजाडायला आता फक्त पाचच वर्षे आहेत. पण किती लांब. मिसाईल सोबत नाही पण मिसाईलचा वेग, त्या वेगाने स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा पेरुन गेला हा मिसाईल मॅन.

कलाम चाचांना अखेरचा सलाम!

कपिल पाटील
अध्यक्ष, लोक भारती
आमदार, मुंबई शिक्षक मतदारसंघ

Share this Story:

Follow Webdunia marathi