Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशावर संघाची विचारधारा लादण्याचा भाजपचा प्रयत्न : राहुल गांधी

देशावर संघाची विचारधारा लादण्याचा भाजपचा प्रयत्न : राहुल गांधी
नवी दिल्ली , शुक्रवार, 29 मे 2015 (11:22 IST)
देशावर संघाची विचारधारा लादण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असून, संघाची शिस्तबद्धता हे व्यक्तिस्वातंत्र्य संपविण्याचे द्योतक असल्याचा घणाघाती आरोप करीत ‘आपली अर्थव्यवस्था ढासळत आहे, असे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी निदर्शनास आणून देताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने मनमोहन यांच्याकडून एक तासाची शिकवणी घेतली’, असा सणसणीत टोला ही काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मोदींना लगावला.
 
एनएसयूआयच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर चौफेर टीका केली.
 
संघाच्या शाखेत कुणालाही प्रश्न विचारण्याची मुभा नाही. रांगेत उभे राहून जे सांगितले जाईल ते निमूटपणे करावे लागते. सरकारमध्ये देखील सध्या तेच सुरू आहे. कोणत्याच विषयावर चर्चा होत नाही आणि देशातसुद्धा त्यांना हेच करायचे आहे. देशावर संघाची विचाराधारा लादण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे हे उदाहरण आहे. शिक्षण मंत्रालयात संघाच्या लोकांचा हस्तक्षेप वाढत असल्याचाही आरोप यावेळी राहुल यांनी केला. देशात ज्या ठिकाणी संघाची विचारधारा लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याठिकाणी जाऊन आवाज उठवण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत मनमोहनसिंग यांनी चिंता व्यक्त केली असता देशाची अर्थव्यवस्था कशी चालते हे समजावून घेण्यासाठी नरेंद्र मोदींनी मनमोहनसिंग यांच्याकडून शिकवणी घेतल्याचाही टोला राहुल गांधी यांनी यावेळी मोदींना लगावला. 
 
देशातील सरकार एकामागोमाग एक चुका करत असल्यामुळे विरोधी पक्षाचेही काम सोपे झाले असल्याचेही ते पुढे म्हणाले. ‘मेक इन इंडिया’तून काहीही साध्य होणार नसल्याचे ठाम मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. मेक इन इंडिया यशस्वी होण्यासाठी देशातील सामान्य जनतेला शक्ती देणे गरजेचे असल्याचे राहुल म्हणाले. परदेश दौर्‍यात व्यस्त असलेल्या मोदींना देशातील शेतकर्‍यांसाठी मात्र वेळ नाही. असेच चालू राहिले तर एकदा शेतकरी यांना नक्कीच धडा शिकवेल, असेही राहुल म्हणाले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi