Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परदेशींसाठी एअर इंडियाचं विमान दीड तास रोखले

परदेशींसाठी एअर इंडियाचं विमान दीड तास रोखले
मुंबई , गुरूवार, 2 जुलै 2015 (11:28 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. मात्र दौऱ्यावर निघताना त्यांचे सचिव प्रवीणसिंग परदेशी यांच्या अक्षम्य हलगर्जीचा त्रास सामान्य प्रवाशांना झाला. अमेरिकेचा व्हिजा घरीच विसरलेल्या परदेशींसाठी एअर इंडियाचं विमान तब्बल दीड तास रोखून धरण्यात आलं.
 
परदेशी यांनी चेक-इन आणि इमिग्रेशन पूर्ण केलं होतं. मात्र बोर्डिंग पॉईंटवर कागदपत्रांची तपासणी करताना अधिकाऱ्यांची ही बाब लक्षात आली. अमेरिकेचा योग्य व्हिजा नव्या पासपोर्टवर नसल्यामुळे त्यांना पुढे जाण्यास मनाई करण्यात आली.
 
त्यानंतर धावपळ करत व्हॅलिड व्हिजा स्टॅम्प असलेला जुना पासपोर्ट प्रवीणसिंग परदेशींच्या घरुन मागवण्यात आला. मात्र तोवर जवळपास एक तास उशीर झाला. परदेशी विमानात चढेपर्यंत एअर इंडियाचं विमान रोखून धरण्यात आलं. त्यामुळे अमेरिकेला निघालेल्या इतर प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
 
सोमवारी रात्री दीड वाजताच्या एअर इंडियाच्या विमानानं मुख्यमंत्री अधिकाऱ्यांसह अमेरिकेला रवाना झाले. मात्र व्हीव्हीआयपी व्यक्तींसाठी सर्वसामान्यांचा खोळंबा केल्यामुळे चहुबाजूने टीकेची झोड उठली आहे.
 
प्रवीणसिंग परदेशी हे 1985 च्या बॅचचे आयएएस ऑफिसर आहेत. परदेशी यानंतरच्या विमानानेही अमेरिकेला रवाना होऊ शकले असते, परदेशींऐवजी एखाद्या सामान्य प्रवाशाकडून अशा प्रकारची चूक झाली असता असं सौजन्य दाखवण्यात आलं असतं का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi