पश्चिम बंगालचे नाव बदलून ते ‘बंगाल’, ‘बांगला’ किंवा ‘बंग’ असे करण्याच्या प्रस्तावास ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
‘पश्चिम’ हा शब्द वगळण्याचा आग्रह धरणाऱ्यांचे म्हणणे असे की, ब्रिटिशांनी त्यांच्या फूटपाडू राजकारणासाठी धर्माच्या आधारावर बंगालची फाळणी केली आणि मुस्लीम बहुसंख्य असलेला बंगालचा पूर्व भाग ‘पूर्व बंगाल’ आणि हिंदू बहुसंख्य पश्चिम भाग ‘पश्चिम बंगाल’ झाला. मात्र आता भारतातील एक संघराज्य असलेल्या बंगालच्या नावामागे ‘पश्चिम’ कायम ठेवण्याचे कोणतेही समर्थनीय कारण नाही. कारण पूर्वीचे पूर्व बंगाल भारताच्या फाळणीनंतर पूर्व पाकिस्तान झाले आणि त्या भागाचा आता तर बांगलादेश हा स्वतंत्र देश स्थापन झाला आहे. केवळ एकच बंगाल आता शिल्लक आहे.
राज्य विधानसभेत हा प्रस्ताव मंजूर करून घेऊन तो केंद्र सरकारकडे पाठविला जाईल. विधानसभेतील तृणमूल काँग्रेसचे बहुमत पाहता तेथे हा प्रस्ताव मंजूर होण्यात काही अडचण येण्याचे कारण नाही. केंद्र सरकारला मात्र राष्ट्रपतींची पूर्वसंमती घेऊन या नावबदलासाठी संसदेत घटनादुरुस्ती मंजूर करून घ्यावी लागेल.