Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिहारला विशेष दर्जा देणार्‍यालाच पाठिंबा-नितिश

बिहारला विशेष दर्जा देणार्‍यालाच पाठिंबा-नितिश

वेबदुनिया

पाटना , शुक्रवार, 15 मे 2009 (15:21 IST)
तन, धन आणि मनाने आपण भाजप आणि एन डी ए सोबत असल्याचे ठासून सांगणाऱ्या बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी आता अचानक कोलांटीऊडी घेतली आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या पक्षालाच आपण समर्थन देणार असल्याचे सांगत त्यांनी कॉग्रेसलाही पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत. कॉंग्रेसनेही नितिश यांची अट मान्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

नितिश कुमार यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटण्याची वेळ मागितली होती असेही कळते. याचा अर्थ नितिश भाजपपासून दूर जात कॉंग्रेसचा हात हाती घेण्याच्या तयारीत असल्याचा निष्कर्ष राजकीय जाणकारांनी काढला आहे. भाजपला याचा मोठा धक्का बसला आहे.

कॉंग्रेसला अट मान्य- चतुर्वेदी
दरम्यान, नितिश यांच्या या वक्तव्यानंतर कॉग्रेस नेते सत्यव्रत चतुर्वेदी यांनी त्यांची अट मान्य असल्याचे जाहीर केल्याने राजधानीत राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. आता नितिश यांनीही कॉग्रेसबाबत सकारात्मक भूमिका घेत प्रसार माध्यमांऐवजी पक्षासी यापुढील बोलणी करावी असेही चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

विशेष दर्जा म्हणजे काय?- दिग्विजय
दरम्यान, कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी नितिश कुमार यांना विशेष दर्जा म्हणजे काय अभिप्रेत आहे, ते सांगावे असे सुचविले आहे. कॉंग्रेस नेहमीच मागास राज्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत.

बिहार हे मह्त्त्वाचे राज्य असून युपीए सरकार या राज्याविषयी नेहमीच संवेदनशील राहिल्याचे त्यांनी सांगितले. वाजपेयी सरकारच्या तुलनेत युपीए सरकारने बिहारला अधिक निधी दिल्याचे सांगून, नितिश यांनी आपली मागणी सुस्पष्ट स्वरूपात मांडावी असे सुचविले.

नितिश यांच्यासाठी गळ
नितिश यांना आपल्याकडे खेचण्यासाठी डाव्यांपासून ते कॉग्रेसपर्यंत साऱ्या पक्षांनी अथक प्रयत्न केले, परंतु नितिश यांनी आपण केवळ भाजपाचीच साथ देणार असल्याचे स्पष्ट केले होते. मध्यंतरी बिहारमध्ये प्रचाराला गेलेले कॉंग्रेसचे युवा नेते राहूल गांधी यांनीही नितिश यांचे कौतुक केले होते. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीही निवडणुकीनंतर नितिश कॉंग्रेसला पाठिंबा देतील असा विश्वास व्यक्त केला होता. पण नितिश लुधियानातील एनडीएच्या रॅलीला उपस्थित राहिल्याने ते या आघाडीबरोबरच निष्ठावान असल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण आजच्या विधानाने नितिश भाजपपासून दूर जात असल्याचे दिसते आहे. निकालानंतरच नितिश नेमके काय करतील हे स्पष्ट होईल, असे दिसते.

Share this Story:

Follow Webdunia marathi