Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेबंद मद्यपानामुळे मुकुल शिवपुत्र पुन्हा चर्चेत

बेबंद मद्यपानामुळे मुकुल शिवपुत्र पुन्हा चर्चेत

वार्ता

NDND
दिग्गज गायक स्व. पं. कुमार गंधर्व यांचे प्रतिभावंत चिरंजीव व प्रख्यात शास्त्रीय गायक मुकुल शिवपुत्र सध्या त्यांच्या बेबंद मद्यपानामुळे चर्चेत आले आहेत. अचानक गायब होणे आणि कुठे तरी मद्यपी अवस्थेत सापडणे असे प्रकार त्यांच्या बाबतीत घडत आहेत.

गेल्या आठवड्यात भोपाळमधील एका मंदिरात मुकुल मद्यधुंद अवस्थेत सापडले होते. प्रसार माध्यमांना ही बातमी कळल्यायानंतर एकच हलकल्लोळ उडाला. पण हे कळताच मुकुल तेथूनही अचानक गायब झाले. शोधूनही सापडले नाहीत. आज भोपाळजवळील होशंगाबाद येथील रेल्वे स्थानकावर ते पुन्हा मद्यधुंद अवस्थेत सापडले. त्यांना तेथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुकुल यांच्या या वागण्यामागे ते मुळातच व्यसनाधीन आहेत की स्वभावातला बेदरकारपणा त्यांना हे करायला भाग पाडतो की अन्य काही कारण आहे, हे काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही. मुकुल यांना जवळून ओळखणार्‍यांच्या मते मुकूल असे नाहीत. त्यांच्या या वागण्याचे त्यांनाही आश्चर्य वाटतेय. ते अनेकदा सहा सहा महिने मद्याला हातही लावत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.

नीतीनियमांत बांधलेले आयुष्य जगणे हे मुकुल यांच्या स्वभावात नाही. घर, पुरस्कार व पैसा यांचा त्यांना मोह नाही. अन्यथा, भोपाळ, दिल्ली वा मुंबई यापैकी कुठेही राहून ते हे सगळे कमाऊ शकले असते, असे त्यांचे मित्र सांगतात.

दरम्यान, राज्याचे सांस्कृतिक सचिव मनोज श्रीवास्तव यांनी होशंगाबादच्या जिल्हाधिकार्‍यांना मुकुल यांची काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. मुकुल यांच्या जवळच्या मित्रांनाही त्यांना होशंगाबादला पाठविले आहे.

मुळचे मध्य प्रदेशातील देवासचे असणार्‍या मुकुल यांनी वयाच्या सतराव्या वर्षी घर सोडले. ग्वाल्हेर घराण्याची गायकी आत्मसात केलेल्या या गायकाच्या प्रतिभेविषयी भल्याभल्यांनी कौतुक केले आहे. त्यांच्या गाण्याचे हजारो लोक चाहते आहेत. शास्त्रीय संगीतातील एक दमदार आवाज म्हणून ते ओळखले जातात. पण त्यांच्या या मनस्वी वागण्याचे कोडे मात्र उलगडलेले नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi