भारतीय भूमि (प्लेट) भूकंपामुळे दरवर्षी पाच से.मी. वायव्य दिशेकडे सरकत आहे. या नैसर्गिकरित्या सरकणाऱ्या प्रक्रियेची नोंद जीपीएसच्या सहाय्याने केली जाते. यासह सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास केला जात असल्याचे माहिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान तथा पृथ्वी विज्ञान राज्य मंत्री वाय.एस. चौधरी यांनी दिली.
पावसाळी या अधिवेशन काळात भंडारा-गोंदिया मतदारसंघाचे खासदार नाना पटोले यांनी भौगोलिक क्षेत्राशी संबंधित अतिशय महत्वपूर्ण प्रश्न विचारला. यावर केंद्रीय मंत्रालयाने लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबतचे स्पष्टीकरण देताना सांगितले, भारतीय प्लेट ही युरेशियन प्लेट्सना घर्षित करते. त्यांच्या या घर्षणामुळे दोन प्लेट्स वरखाली होतात आणि त्यामुळे हिमालय पर्वत रांगेत भूकंप येतो. यामुळेच भारतीय भूमी दरवर्षी 5 से.मी. वायव्यच्या दिशेने सरकत आहे.
जमिनीच्या आत होणाऱ्या या भूकंपापासून संरक्षणासाठी भारतीय मानक ब्यूरोने ठरविलेल्या मापदंडाचे पालन करून निर्माणाधीन बांधकामात भूकंप विरोधी रचना करणे तसेच अस्तित्वात असणाऱ्या इमारतींमध्ये रिट्रोफिटिंगचा उपयोग करण्याचे निर्देशित केलेले आहे. त्याप्रमाणे जनसामान्यांमध्ये तसेच भूकंप प्रवण क्षेत्रात भूकंप विरोधी रचनेचा उपयोग करण्याबाबत केंद्रीय पृथ्वी विज्ञान विभागाकडून जागरूकता निर्माण करण्यात येत आहे.
भूकंपापासून होणारे नुकसान थांबविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृह मंत्रालय, पृथ्वी विज्ञान मंत्रालय यासह सर्व राज्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सामान्य नागरिकांमध्ये, शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचे काम करते. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया बळदेखील नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्ती रोखण्याचा प्रयन्त करीत आहे.
बाजारात, शाळामध्ये, रुग्णालयात, रेल्वे स्थानक, विमानतळ अशा अनेक महत्वाच्या ठिकाणी आपत्तीच्या काळात कशा पद्धतीने बचाव केला जावा, यासाठी मॉक ड्रिलव्दारे प्रशिक्षणातून जनजागृती केली जाते.