Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘तो मला नीट सांभाळतो’ म्हणणाऱ्या रेबिकाचे सापडले 18 तुकडे

‘तो मला नीट सांभाळतो’ म्हणणाऱ्या रेबिकाचे सापडले 18 तुकडे
, बुधवार, 21 डिसेंबर 2022 (13:04 IST)
झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यामध्ये एका महिलेच्या हत्येच्या प्रकरणावरून चांगलीच राळ पेटली आहे. या महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते.  स्थानिक पोलिसांच्या मते आतापर्यंत मृतदेहाचे एकूण 18 तुकडे शोधण्यात यश आलं आहे. हे प्रकरण काही दिवसांपूर्वी संसदेतही गाजलं होतं. भाजपच्या खासदारांनी हा मुद्दा लावून धरला होता. मृत महिलेची ओळख पटविण्यात आली असून तिचं नाव रेबिका असल्याचं समोर आलं आहे. ती आदिवासी समुदायातील होती.

एक महिन्यापूर्वी रेबिकाचा विवाह दिलदार अन्सारी या मुस्लिम युवकासोबत झाला होता. या दोघांनीही घरातून पळून जाऊन लग्न केलं होतं. दिलदारचं हे दुसरं लग्न होतं. त्याची पहिली बायको सरेजा खातूनही दिलदारच्याच घरी राहायची. रेबिका ही पहाडिया समुदायाची होती. तिला पाच वर्षांची एक मुलगी आहे. रेबिका ही राजीव मालतो नावाच्या युवकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. या नात्यात असतानाच तिच्या मुलीचा जन्म झाला होता.
 
दरम्यान, या हत्येप्रकरणी पोलिसांनी दिलदारसह 10 लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
साहेबगंजचे डीआयजी सुदर्शन मंडल यांनी सांगितलं, “रेबिकाची हत्या 16 डिसेंबरच्या रात्री झाली होती. दिलदारवर पहिल्यापासूनच संशय होता.” “काही दिवसांपूर्वी तो आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवायला बोरियो पोलिस ठाण्यात आला होता.” रेबिकाची हत्या कट रचून करण्यात आल्याचं मंडल यांनी सांगितलं. हत्या करून मृतदेहाचे तुकडे जवळच्याच अंगणवाडी केंद्रात टाकण्यात आले होते.
या प्रकरणाच्या तपासासाठी सध्या एसपी अनुरंजन किसपोट्टा यांच्या नेतृत्वात विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे.
 
‘आता रेबिकाच्या मुलीला कोण?’
रांची जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 403 किलोमीटर दूर बोरियो पोलिस ठाण्यापासून 13 किलोमीटर अंतरावर रेबिकाचं गाव आहे...गोडा पहाड. तीन किलोमीटरची चढण चढल्यावर तिचं घर लागलं. अंगणातच सगळे नातेवाईक आणि गावातल्या बायका बसल्या होत्या. सगळ्याजणी पहाडी भाषेत काहीतरी कुजबुजत होत्या आणि रडत होत्या. रेबिकाची पाच वर्षांची मुलगी रिया आपली आजी चांदी पहाडिन आणि मावशी शीला पहाडिन यांना रडताना पाहात होती. शीलाने म्हटलं, “माझी आई हिंदी बोलत नाही आणि तिला समजतही नाही. मीच बोलेन तुमच्याशी.”

बीबीसी हिंदीशी बोलताना त्यांनी सांगितलं, की “बहीण बेपत्ता झाल्याची माहिती दिलदारने त्यांना फोनवरूनच दिली होती. त्यानंतर एका दिवसानेच म्हणजे 17 डिसेंबरला संध्याकाळी एक मृतदेह सापडल्याचं सांगणारा फोन आला. रात्री पोलिसांनी मृतदेहाचे फोटो आणि व्हीडिओ पाठवला. डाव्या हाताचं बोट पाहूनच तिला आम्ही ओळखलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रत्यक्ष पोलिस स्टेशनला गेलो, तेव्हा कपडे पाहूनच तो मृतदेह माझ्या बहिणीचा असल्याचं लक्षात आलं.”
 
शीला सांगतात, “राजीव मालतोसोबत तिचं लग्न झालं नव्हतं, दोघं एकत्र राहायचे. त्याचवेळी तिला मुलगीही झाली. पण मुलीच्या जन्मानंतर काही दिवसातच तो तिला सोडून निघून गेला. आता त्या मुलीची आईही गेली. आता तिला मी कसं सांभाळू? तिचं शिक्षण कसं होईल?
 
दिलदारच्या कुटुंबीयांसोबत होणाऱ्या भांडणांबद्दल तुमची बहीण घरी कधी सांगायची का?
शीला म्हणतात, की तिनं भांडणाबद्दल कधीच सांगितलं नाही. उलट तो आपल्याला खूप नीट सांभाळतो असंच सांगायची.

सहा बहीण-भावंडांमध्ये रेबिका तिसरी होती. तिच्या कुटुंबीयांना न्याय हवा आहे. रेबिकाचा धाकटा भाऊ आरसन मालतो म्हणत होता की, ज्या लोकांनी मिळून आपल्या बहिणीची हत्या केलीये, त्या सर्वांना फाशीची शिक्षा व्हायला हवी. या कुटुंबासमोर इतरही अडचणी आहेत. रेबिकाच्या दोन बहिणी- प्रमिला पहाडिन आणि दुलेली पहाडिन या बाल सुधारगृहात आहेत.

स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार 13 डिसेंबरला बोरियोमधल्या हॉटेलमध्ये देह व्यापार होत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी छापा मारला होता. इथे दोन मुलींसोबत एक मुलगा होता. या तिघांनाही बाल सुधारगृहात पाठविण्यात आलं आहे.
 
शीला सांगतात की, त्यांच्या दोन्ही बहिणी बाल सुधारगृहात आहेत. रेबिकाच्या घरून आम्ही निघालो आणि जंगलात थोडंसंच पुढे गेलो होतो. त्याचवेळी आम्हाला भाजप नेत्या आणि माजी मंत्री डॉ. लुईस मरांडी त्यांच्या लवाजम्यासह येताना दिसल्या. शीलाने त्यांना पुन्हा एकदा काय घडलं ते सांगितलं. बाल सुधारगृहात बंद असलेल्या आपल्या दोन्ही बहिणींची सुटका व्हावी म्हणून मदतीची याचना केली.

डॉ. लुईस मरांडी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, “रेबिकाच्या मुलीचा काय दोष आहे? महिला असणं हा अपराध आहे का? काही दिवसांपूर्वी दुमका जिल्ह्यात अंकिता कुमारीला पेट्रोल टाकून जाळण्यात आलं. जरमुंडी भागातही मारूती कुमारीला पेट्रोल टाकून जाळलं गेलं. दुमकामध्येच एका आदिवासी मुलीला झाडाला लटकवून मारण्यात आलं.”
 
पोलिस काय सांगतात?
कौटुंबिक कलहामुळेच रेबिकाची हत्या झाल्याची शंका पोलिस व्यक्त करत आहेत.
रेबिकाच्या मृतदेहाचे तुकडे शवविच्छेदनासाठी रांचीमधली रिम्स हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहेत.
 
पोलिसांनी नोंदविलेल्या एफआयआरमध्ये दिलदार अन्सारी (27 वर्षे), मैनुल हक (53 वर्षे), महताब अन्सारी (22 वर्षे), जरीना खातून (48 वर्षे), सरेजा खातून (25 वर्षे), गुलेरा खातून (29 वर्षे), आमिर हुसैन (23 वर्षे), मुस्तकिम अन्सारी (60 वर्षे), मरियम निशा (55 वर्षे) आणि सहरबानो खातून यांना आरोपी मानण्यात आलं आहे.
 
सोमवारी संध्याकाळी त्यांना अटक करून तुरुंगात पाठविण्यात आलं.
दिलदार अन्सारीचा भाऊ आमिर अन्सारीने पोलिसांना सांगितलं की, दिलदारचं पहिलं लग्न सरेजा खातूनसोबत झालं आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने रेबिकाशी लग्न केलं. घरच्यांना हे आवडलं नाही. त्यानंतर तो तिला घेऊन बेंगळुरूला राहायला गेला. आमिर अन्सारीचा जबाब एफआयआरमध्ये नोंदविण्यात आला आहे.

रेबिकाची बहीण शीला सांगतात, “बेंगळुरूवरून परत आल्यानंतर दिलदाराच्या घरात भांडण वाढायला लागली, तेव्हा माझे वडील रेबिकाला घेऊन परत आले. पण दोघंजण बाजारात वगैरे भेटायला लागले आणि तो तिला पुन्हा घरी घेऊन गेला.” एफआयआरमध्ये नोंदविल्याप्रमाणे, दिलदार आपल्या घराऐवजी बोरियोतच दुसरं घर भाड्याने घेऊन राहायला लागला होता. या घटनेच्या 15-20 दिवस आधीच तो रेबिकाला घेऊन गेला होता. त्यानंतर त्याच्या घरातली भांडणं वाढली होती.

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार रेबिकाला मार्गातून दूर करण्यासाठी सुनियोजितपणे कट आखत दिलदारची आई मरियम निशाने तिला आपला भाऊ मैनुल अन्सारीकडे ठेवलं. मृतदेह गायब करण्यासाठी तिने आपल्या भावाला वीस हजार रुपयांची रक्कमही दिली होती. मैनुल यांचं घर शेजारच्याच गल्लीत फाजिल टोला भागात आहे. रेबिका मैनुलच्या घरी पोहोचल्यानंतर मरियम यांनीच ती गायब झाल्याची अफवा पसरवली. 17 डिसेंबरला संध्याकाळी 5.45 वाजता पोलिसांना माहिती मिळाली की, बोरियामधल्या संताली गल्लीतल्या अंगणवाडी केंद्राजवळ काही कुत्र्यांची कळवंड लागली आहे. तिथे काहीतरी संशयास्पद असू शकतं. तिथे पोहोचल्यावर पोलिसांना मृतदेहाचे तुकडे मिळाले.

त्यानंतर दिलदार अन्सारीला बोलावून मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. तेव्हा त्याने हाताच्या बोटांवरील नेल पॉलिश आणि पाय पाहून रेबिकाचा मृतदेह ओळखला. रेबिकाच्या मृतदेहाचे काही भाग हे मोमिन टोल्यापाशी मिळाले. तिथेच दिलदारच्या मामाचं, मैनुल अन्सारीचं घर आहे. या घरातून पोलिसांना रक्ताने माखलेले कपडेही जप्त केले. तिथे आता पोलिस बंदोबस्त आहे. या गल्लीत राहणाऱ्या एका महिलेनं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, मैनुलने पूर्ण भागाचीच बदनामी केली आहे.
 
संपूर्ण गल्लीमध्ये स्मशानशांतता
दिलदारच्या बेलटोला इथल्या घरात आता कोणी नाहीये. आठ पोलिस कर्मचारी इथे बंदोबस्तावर आहेत. घराच्या समोरच ग्राहक सेवा केंद्राचं एक दुकान आहे. दुकानदार आणि दिलदारचे शेजारी मुझफ्फर अन्सारीने बीबीसीशी बोलताना म्हटलं, “दिलदार मुळात अपराधी नाहीये. पण या आदिवासी मुलीच्या येण्यानंतर त्यांच्या घरात खूप भांडणं व्हायला लागली. केवळ या घटनेबद्दल बोलायचं झालं तर, आम्हाला शेजारी राहूनही काही माहीत नाही. काही दिसलं नाही...काही ऐकायला मिळालं नाही.”
 
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी (19 डिसेंबर) गोड्डाचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी हे प्रकरण मांडलं. त्यांनी म्हटलं, “बांगलादेशी घुसखोरांनी आमच्या भागांवर कब्जा केला आहे आणि हे झारखंड सरकारच्या मदतीने सुरू आहे. पहाडिया समुदायाच्या एका मुलीशी जबरदस्तीने लग्न केलं आणि मग तिचे तुकडे केले.” “दिल्ली, कलकत्ता किंवा मुंबईमध्ये ही घटना घडली तर पूर्ण देशातल्या माध्यमांनी ही बातमी उचलून धरली असती.”
झारखंड विधानसभामध्ये हेमंत सोरेन यांनी या प्रकरणी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटलं, “रेबिका प्रकरणी साहिबगंजबद्दल का बोलावं? दिल्ली, एमपी किंवा युपीमध्ये अशा घटना घडत नाहीत का? निश्चितपणे समाजात अशा विकृती पसरत आहेत आणि ही समाजासाठी चिंतेची बाब आहे. लोकशाहीत अशा गोष्टींना जागा नाही. यावर केवळ चर्चेतूनच उत्तर शोधता येऊ शकतं.”
 
Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी होत असलेलं नागपूर NIT भूखंड प्रकरण काय आहे?