2 real sisters hanged themselves in Brahma Kumari Ashram संपूर्ण देश रंगीबेरंगी दिव्यांनी दीपोत्सवाचा उत्सव साजरा करत असताना, दोन सख्ख्या बहिणींनी आपले जीवन कायमचे संपवले आहे. या दोन सख्ख्या बहिणी आग्रा येथील प्रजापती ब्रह्मा कुमारी आश्रमात राहत होत्या आणि येथेच त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी या बहिणींनी तीन पानी सुसाइड नोट सोडली, ज्यामध्ये त्यांनी संस्थेच्या चार लोकांना त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. एवढेच नाही तर आत्महत्या केलेल्या बहिणींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सुसाईड नोटमध्ये त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या चार जणांना बापू आसारामप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकता आणि शिखा या दोघीही रक्ताच्या नात्यात असून, या बहिणींनी 8 वर्षांपूर्वी ब्रह्मा कुमारीमध्ये दीक्षा घेतली होती. ब्रह्मा कुमारी झाल्यानंतर या दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी आग्रा जगनेर येथे ब्रह्मा कुमारी केंद्र बांधले होते, ज्यामध्ये त्या दोघी राहत होत्या. मुलींच्या मृत्यूने कुटुंबीयही दु:खी झाले आहेत.
मृत्यूला कवटाळण्यापूर्वी 32 वर्षीय शिखा आणि तिची 38 वर्षीय बहीण एकता यांनी पोलिसांसाठी दोन पानी सुसाइड नोट सोडली.
शिखाने आत्महत्येमध्ये लिहिले आहे की, दोन्ही बहिणी गेल्या एक वर्षापासून अडचणीत असून, आश्रमातील 4 कर्मचाऱ्यांकडून त्यांचा छळ केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूसाठी आश्रमाचे नीरज सिंघल, धौलपूरचे ताराचंद, नीरजचे वडील आणि ग्वाल्हेरच्या आश्रमात राहणाऱ्या एका महिलेला जबाबदार धरण्यात आले आहे. पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे कारवाई सुरू केली आहे.
सुसाईड नोटमध्ये मयत बहिणींनी आश्रमातील चार कर्मचाऱ्यांवर पैशांचा अपहार आणि अनैतिक कृत्ये केल्याचा आरोपही केला आहे. त्यांच्या छळाला कंटाळून दोन्ही बहिणींनी गळफास घेण्याचा निर्णय घेतला. ब्रह्मा कुमारींच्या मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली असून लोक हादरले आहेत.
आश्रमात एकाच वेळी दोन मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सुसाईड नोट ताब्यात घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलीस एसीपी खैरागड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपी आग्रा जिल्ह्याबाहेरचे आहेत. यापैकी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य दोन आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करून पाठवण्यात आली आहेत.