चीनसोबत झालेल्या चकमकीत जवळपास 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. सरकारी सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने ही माहिती दिली आहे.
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैन्य यांच्यात चकमक झाल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून हे वृत्त आले आहे. याआधी एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती.
15 जून म्हणजे सोमवारी रात्री भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांसमोर आले होते. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाली होती. या चकमकीत चीनचे जवानही मृत्यूमुखी पडलेले असून सुमारे 43 जवान गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात येत आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 15 जूनच्या रात्री चीनकडून एकतर्फीपणे वास्तविक नियंत्रण रेषेवरील सद्यस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन्ही सैन्यांचं नुकसान झालं आहे.