हैदराबादच्या अंबरपेट परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे रस्त्याने जाणाऱ्या 4 वर्षाच्या मुलाला भटक्या कुत्र्यांनी ओरबाडले. कुत्र्यांच्या झुंडीने मुलाचे लचके तोडले आणि त्याला ओढत नेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले.
रविवारी घडलेली संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीत दिसतं आहे की मुलगा कुठेतरी जात असताना त्याच्या मागून कुत्रे हल्ला करतात. मुलगा जमिनीवर पडतो तर कुत्रे हल्ला करत चावा घेतला. मुलाला ओढत नेतात. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील तिथे पोहोचतात.
मुलाला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं गेलं पण उपचारापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
गंगाधर चार वर्षांपूर्वी पत्नी आणि दोन मुलांसह कामानिमित्त हैदराबादला आले होते. ते अंबरपेठेतील एका कार सर्व्हिस सेंटरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाले. गंगाधर रविवारी प्रदीपला सोबत घेऊन आले होते. मुलाला त्यांच्या केबिनमध्ये सोडून गंगाधर कामानिमित्त बाहेर गेले. थोड्या वेळाने प्रदीप केबिनमधून बाहेर आला आणि पार्किंगमध्ये पोहोचला. तेव्हा कॅम्पसमध्ये तो एकटाच फिरत असताना त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला.
हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने भटक्या कुत्र्यांचा त्रास पुन्हा समोर आला आहे, अनेकांनी सोशल मीडियावर मुलावर झालेल्या हल्ल्याचे व्हिज्युअल शेअर केले आहेत आणि अधिकाऱ्यांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.