जुनी पाचशेची नोट चालवण्यासाठी आता तुमच्याकडे आजचा (गुरुवार) दिवस शिल्लक आहे. आज मध्यरात्रीनंतर पाचशे रुपयांची जुनी नोट चलनातून कायमची बाद होणार आहे. त्यामुळे रुग्णालय, विमानतळ, पेट्रोल पंप, दूधकेंद्र अशा कुठल्याच ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर गैरसोय टाळण्यासाठी जीवनावश्यक ठिकाणी आणि सरकारी कार्यालयांमध्ये जुन्या नोटा स्वीकारल्या जात होत्या. मात्र, या नोटा स्वीकारण्याची ही मुदत आज (गुरुवार) संपणार आहे.
एक हजारच्या नोटा २४ नोव्हेंबरपासून सरकारने बाद ठरवल्या आहेत. या नोटा जीवनावश्यक ठिकाणी आणि सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा स्वीकारल्या जात नाहीत. या नोटा ३० डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तुमच्याकडे पाचशे किंवा हजार रुपयांच्या जुन्या नोटा असतील, तर ३० डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमच्या बँकेत त्या जमा करु शकता. अन्यथा प्रतिज्ञापत्रासह ३१ मार्चपर्यंत आरबीआयकडे तुम्ही या नोटा बदलू शकता.