राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्या जेवणात अंड्याचं कवच आढळल्यामुळे एअर इंडिया विमान कंपनीने संबंधित केटररला दंड केला आहे. पुणे-दिल्ली फ्लाईटमध्ये देण्यात आलेल्या ऑमलेटमध्ये अंड्याचं कवच आढळल्याची तक्रार चव्हाण यांनी रविवारी केली होती. यावेळी विमानात आपल्याला दिलेल्या ऑमलेटमध्ये अंड्याच्या कवचाचे तुकडे सापडल्याचा दावा त्यांनी केला होता. तसे फोटो ट्वीट करत वंदना चव्हाण यांनी संताप व्यक्त केला होता.
एअर इंडियाच्या विमानात पुरवल्या जाणाऱ्या अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. ‘काही दिवसांपूर्वी भल्या सकाळी एअर इंडियाच्या फ्लाईटने पुण्याहून दिल्लीला जात होते. ब्रेकफास्टला मी ऑमलेट मागवलं. तीन-चार घास खाऊन झाल्यावर अंड्याच्या कवचाचे तुकडे त्यात दिसले’ असं ट्वीट वंदना चव्हाण यांनी रविवारी केलं.