एकाच नावाची एकापेक्षा अधिक महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थ्यांचा होणारा गोंधळ टाळण्यासाठी आता महाविद्यालयांची नावेच बदलून टाकण्याची सूचना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने दिली आहे. ‘राज्यात एका नावाचे एकच महाविद्यालय असावे,’ असे परिषदेने म्हटले आहे. त्यामुळे एका महाविद्यालयासाठी परवानगी घ्यायची आणि त्याच नावाने इतर काही महाविद्यालये अनधिकृतपणे चालवायची, हा शिक्षणसंस्थांचा गैरप्रकारही आटोक्यात येण्याची शक्यता आहे.
तंत्रशिक्षण म्हणजेच अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वास्तुकला, औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्यपातळीवर केंद्रीय पद्धतीने करण्यात येते. प्रवेश अर्जात महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरताना एकाच नावाची किंवा नावाशी साधम्र्य असलेली महाविद्यालये यादीत एकाखाली एक सलग असतात. नावातील साधम्र्यामुळे विद्यार्थ्यांचा महाविद्यालयांचे पर्याय देण्यात गोंधळ उडतो. त्याचप्रमाणे मोठय़ा, नामांकित महाविद्यालयांच्या नावाशी साधम्र्य असलेली महाविद्यालये छोटय़ा संस्थांकडूनही सुरू करण्यात येतात. त्यातूनही विद्यार्थ्यांची फसवणूक होते.