Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीएचयू विद्यार्थिनीवर कथित गँगरेप: 60 दिवसांनी तीन आरोपींना अटक, विरोधक भाजपविरुद्ध आक्रमक का?

arrest
, सोमवार, 1 जानेवारी 2024 (09:10 IST)
आयआयटी बीएचयूच्या विद्यार्थिनीवरील कथित गँगरेप प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. वाराणसीच्या एका न्यायालयानं तिन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही घटना एक नोव्हेंबरला बीएचयू कॅम्पसमध्ये घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
घटनेच्या जवळपास 60 दिवसांनंतर कुणाल पांडेय, आनंद उर्फ अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली.
 
घटनेसाठी वापरण्यात आलेली दुचाकीही जप्त करण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
तिन्ही आरोपींनी गुन्हा कबूल केला असल्याची माहिती वाराणसी झोनच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना दिली.
 
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिन्ही आरोपींना रविवारी (31 डिसेंबर) सायंकाळी एका स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टानं तिघांची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश दिले आहेत.
 
पोलिसांनी काय सांगितले?
वाराणसीच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी बीबीसीला माहिती दिली.
 
डीसीपी रामसेवक गौतम यांनी म्हटलं की, "तिन्ही आरोपींना शनिवारी (30 डिसेंबर) रात्री उशिरा त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे."
 
"आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. घटनेसाठी वापरण्यात आलेली दुचाकीही जप्त करण्यात आली," अशी माहितीही त्यांनी दिली.
 
आरोपींना घटनेच्या सुमारे 60 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे.
 
अटक करण्यासाठी झालेल्या विलंबाबाबत बोलताना डीसीपी गौतम म्हणाले की, "या घटनेबाबत आमची चौकशी आणि शोधमोहीम सुरू होती. आरोपींना अटक करण्यापूर्वी त्यांना वेळ देणं हा आमच्या योजनेचा भाग होता."
 
"पोलिस आरोपींबाबत माहिती गोळा करत आहेत. त्यांचा आधीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यांच्या विरोधात गँगस्टर अॅक्टही लागू केला जाईल," असंही ते म्हणाले.
 
आरोपींबाबत भाजपला प्रश्न
या चर्चित प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी भाजपच्या आयटी सेलशी संबंधित असल्याचा दावाही केला जात आहे.
 
पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांबरोबरचे त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 
कुणाल पांडेय वाराणसीमध्ये भाजपच्या आयटी सेलचे संयोजक होते, असाही दावा केला जात आहे.
 
सक्षम पटेल भाजपच्या वाराणसी युनिटमध्ये आयटी सेलचे सहसंयोजक असल्याचं सांगितलं जात आहे.
 
आनंद उर्फ अभिषेक आयटी सेल कार्यसमितीचे सदस्य राहिले आहेत.
 
सक्षम पटेल भाजपच्या वाराणसी प्रांताचे मावळते अध्यक्ष दिलीप पटेल यांचे खासगी सचिव आहेत, अशी माहिती दिली जात आहे.
 
या सर्व दाव्यांसाठी तिन्ही आरोपींच्या सोशल मीडिया प्रोफाईलचा हवाला दिला जात आहे. एका भाजप नेत्याच्या लेटरहेडवरील त्यांच्या नियुक्तीची घोषणा करणारं पत्रही व्हायरल होत आहे. बीबीसीनं या पत्राची सत्यता तपासलेली नाही. मात्र, अनेक लोक ते खरं असल्याचा दावा करत आहेत.
 
भाजपचे नेतेही अनौपचारिक चर्चेत पक्षाशी त्यांचा संबंध असल्याचं मान्य करत आहेत.
 
या तिघांची पक्षातून हकालपट्टी केल्याचा दावा बातम्यांमधून केला जात आहे.
 
मात्र भाजपकडून अद्याप याबाबत औपचारिकरित्या काहीही सांगण्यात आलेलं नाही.
 
आरोपींच्या भाजपच्या आयटी सेलशी असलेल्या संबंधांबाबतच्या प्रश्नावर पोलिस अधिकारी म्हणाले की, "यामुळं तपासावर काहीही फरक पडणार नाही."
 
नेमकं काय प्रकरण आहे?
या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार नोव्हेंबर महिन्याच्या एक तारखेला रात्री जवळपास दीड वाजता आयआयटी बीएचयूच्या बीटेकची विद्यार्थिनी तिच्या त्यांच्या न्यू गर्ल्स हॉस्टलच्या बाहेर फिरण्यासाठी निघाल्या होत्या.
 
काही अंतरावर असलेल्या गांधी स्मृती छात्रावास चौकात त्यांना एक मित्र भेटला. ते दोघं कर्मन वीर बाबा मंदिराजवळ होते त्याचवेळी बुलेटवरून तिन्ही आरोपी तिथं आले आणि त्यांना बळजबरी थांबवलं.
 
एफआयआरनुसार आरोपींनी विद्यार्थिनीच्या मित्राला मारहाण केली आणि बंदूक दाखवून विद्यार्थिनीला निर्वस्त्र केलं आणि नंतर तिच्याबरोबर अश्लिल कृत्य करत व्हिडिओही तयार केले.
 
या घटनेचा कुठंही उल्लेख केला तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्यांनी दिली.
 
या घटनेनंतर आरोपींची अटक आणि कॅम्पमध्ये सुरक्षेत त्रुटीच्या मुद्द्यावरून आयआयटी बीएचयू आणि बीएचयूच्या इतर विभागाच्या विद्यार्थ्यांनी दहा दिवस आंदोलन केलं.
 
त्यानंतर बीएचयू चौकीचे प्रभारी यांना लाइन हजर आणि स्थानिक लंका पोलिस ठाण्याच्या प्रमुखांना सस्पेंड करण्यात आलं.
 
भाजप नेते काय म्हणाले?
भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य हंसराज विश्वकर्मा यांनी एका अनौपचारिक चर्चेत म्हटलं की, आरोपी आयटी सेलचे सदस्य होते.
 
या घटनेत नाव येताच पक्षानं आरोपींची पक्षातून हकालपट्टी केली, असं ते म्हणाले.
 
रविवारी (31 डिसेंबर) वाराणसीमध्ये अनेक मोठे भाजप नेते या प्रश्नांपासून पळ काढताना दिसले.
 
उत्तर शहरचे आमदार आणि स्टॅम्प मंत्री रवींद्र जयस्वाल यांनीही माध्यमांशी अनौपचारिक चर्चेत दोषींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल, असं म्हटलं.
 
विरोधकांचा हल्लाबोल
काँग्रेस या प्रकरणी भाजपला थेट प्रश्न विचारत आहे.
 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी घटनेच्या काही दिवसांतच यात भाजप आणि विद्यार्थी परिषदेच्या लोकांचा समावेश असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणी लंका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
आरोपींच्या अटकेनंतर अजय राय यांनी सोशल मीडिया साइट एक्सवर त्यांचे भाजप नेत्यांबरोबरचे फोटो पोस्ट केले. त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत या प्रकरणी केलेल्या जुन्या वक्तव्यांचा पुनरुच्चारही केला.
 
समाजवादी पार्टीचे विधान परिषदेचे सदस्य आशुतोष सिन्हा यांनी विद्यार्थिनीशी कथित गँगरेप प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा मिळण्याची मागणी केली.
 
"सध्या उत्तर प्रदेश अपराध प्रदेश बनला आहे. त्यासाठी भाजप नेतेच जबाबदार आहेत," असं त्यांनी म्हटलं.
नारी-वंदन', 'अँटी रोमियो' आणि 'बेटी पढाओ, बेटी बचाओ' या भाजपच्या महिला सशक्तिकरणाच्या घोषणा हवेत उडून गेल्याचंही ते म्हणाले.
 
पक्षाचे प्रवक्ते मनोज राय धूपचंडी यांनी सोशल मीडियावर टीका करत लिहिलं की, "नारी वंदनचा दिखावा करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा पुन्हा समोर आला आहे."
 
समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या घटनेबाबत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले. स्थानिक नेत्यांनीही या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उडवली आहे.
 
 
Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवमुद्रा कधी तयार झाली? शिवमुद्रेवर असलेल्या मजकुराचा अर्थ काय?