उ
द्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडल्या प्रकरणी वेगवान घडामोडी घडत आहेत. याचदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले होते. जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली.
“शरद पवारांनी मुंबईत सध्या ज्या ताज्या घडामोडी सुरु आहेत त्याची माहिती घेतली. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटकं सापडली त्यातही काय घडामोड सुरु आहे याची माहिती त्यांनी घेतली. एनआयए आणि एटीएस या घटनेचा तपास करत असून राज्य सरकार पूर्ण सहकार्य करत आहे. योग्य दिशेने तपास सुरु असून जो कोणी दोषी असेल, त्यांच्यावर राज्य शासनाच्या मार्फत कारवाई केली जाईल. पण जोपर्यंत एनआयएचा संपूर्ण रिपोर्ट येत नाही, चौकशी पूर्ण येत नाही तोपर्यंत सांगता येणार नाही. रिपोर्ट आल्यानंतर त्यातून ज्या काही गोष्टी समोर येतील त्यानुसार कारवाई केली जाईल,” असं अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं.