"नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कुठल्याही जात-धर्मावर आधारित काम करत नाही, पुराव्यांच्या आधारे काम करतो. आमच्यावरील सर्व आरोप निराधार असून, सर्व कारवाई कायदेशीर मार्गानेच करतो," असं NCB चे अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीवर केलेल्या आरोपांनंतर एनसीबीनं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह आणि समीर वानखेडे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
"मनिष भानुशाली आणि गोसावी यांना 2 ऑक्टोबरच्या छाप्याआधी एनसीबी ओळखत नव्हती. छाप्यात अटक केलेल्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना एनसीबीच्या कार्यालयात आणलं गेलं. अटक किंवा ताब्यात असलेल्यांसोबत एनसीबी नीट वागली," असं एनसीबीनं सांगितलं.
तसंच, "एकूण 14 जणांना एनसीबीच्या कार्यालयात आणलं गेलं होतं. सगळ्यांची चौकशी केली गेली आणि जबाब नोंदवला गेला. त्यातील 8 जणांना पुराव्याआधारे अटक करण्यात आली, तर 6 जणांना पुराव्याअभावी सोडलं," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
येत्या काळात पूर्ण ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करू, असंही एनसीबीनं म्हटलंय.
NCB ने प्रतिक गाबा, ऋषभ सचदेव, अमित फर्निचरवाला यांना सोडून दिलं, नवाब मलिकांचा आरोप
प्रतिक गाबा, ऋषभ सचदेव, आमिर फर्निचरवाला यांना कोणाच्या सांगण्यावरून सोडून देण्यात आलं, याची माहिती NCBने द्यावी असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलाय.
1300 लोक असलेल्या जहाजावर छापा टाकण्यात आला. यापैकी 11 लोकांना ताब्यात घेण्यात आलं, चौकशीसाठी आणण्यात आलं आणि या तिघांना सोडून देण्यात आलं, असं नवाब मलिक यांचं म्हणणं आहे.
या तिघांना सोडून द्यावं यासाठी दिल्लीपासून NCB ला फोन करण्यात आले, असा आरोप मलिक यांनी केलाय. या तिघांचे आणि समीर वानखेडेंचे कॉल डिटेल्स काढण्यात यावेत अशी मागणी नवाब मालिक यांनी केली आहे.
या क्रूझवरचा छापा प्लान करण्यात आला असून ही केस खोटी आहे, ठरवून लोकांना पकडण्यात आलं असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
सोडून देण्यात आल्याचा आरोप असलेल्यांपैकी एक - ऋषभ सचदेव हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष राहीलेल्या मोहित कंभोज यांचा मेव्हणा आहे. मोहित कंभोज यांनी आता नाव बदललं असून ते मोहित भारती नाव लावतात.
यासोबतच पंच असलेल्या किरण कोसावी यांचे दोन पंचनाम्यात वेगवेगळे पत्ते असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केलाय. प्रतिक गाबा, आमिर फर्निचरवाला हे आर्यन खानचे मित्र असू त्यांनीच आर्यनला क्रूझवर आणलं आणि त्या दोघांना सोडून देण्यात आलं, हा एक लोकांना बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
NCB चं पुढचं टार्गेट शाहरुख खान असल्याची चर्चा आधीच होती, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.
दरम्यान, भाजपनं नवाब मलिक यांचे आरोप फेटाळले आहेत.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, "मोहित कंभोज यांच्या मेव्हण्यावरचा आरोप सिद्ध झालेला नाही, हा संबंधितांना वाचवण्याचा नवाब मलिक यांचा केविलवाणा प्रयत्न आहे."
मलिकांच्या जावयांना NCBने अटक केली होती, मग त्यासाठी मलिकांना जबाबदार धरावं का, असा सवालही भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
वानखेडे यांनी काल काय स्पष्टीकरण दिलं?
"लोक काय बोलतात हे मी मान्य करत नाही. मी फक्त कायदा पाळतो. रूल फॅालो करतो. जे योग्य आहे ते करतो," असं स्पष्टीकरण NCB मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलं आहे.
बीबीसी प्रतिनिधी मयांक भागवत यांना दिलेल्या मुलाखतीत आपल्यावरील सर्व आरोपांवर समीर वानखेडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
अटकेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, "या प्रकरणी चौकशी सुरू असल्याने जास्त काहीच बोलता येणार नाही. हे प्रकरण कोर्टात आहे. मोठ्या प्रमाणावर डृग्ज जप्त करण्यात आली आहेत. विदेशी नागरिकांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. NCB प्रोफेशनल तपास यंत्रणा आहे. कायद्यांमध्ये जे लिहिलेलं आहे त्या प्रमाणे आम्ही काम करतो."
ते पुढे म्हणाले, "या प्रकरणात आम्ही माहिती दिलीये. मी एवढंच सांगेन सर्वकाही कायद्याला धरून आणि कायद्यानुसार करण्यात आलंय. काही अवैध करण्यात आलेलं नाही. याबाबत प्रश्नांची उत्तरं आम्ही कोर्टात देऊ, मी फक्त कायदा पाळतो. कायदा दोन व्यक्तींसाठी वेगळा नसतो. सर्वांसाठी कायदा समान आहे. कायदा कोणतीही भेदभाव करत नाही."