केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल उद्या अर्थात बुधवारी जाहीर करण्यात येणार आहे. केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यासंबंधी घोषणा केली. सोमवारी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. यावेळी cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहायला मिळणार आहे.
सीबीएसई बोर्डाच्या दहावीचे तब्बल १८ लाख विद्यार्थ्यी निकालाच्या प्रतीक्षेत होते. मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटरद्वारे सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या निकालाच्या तारखेची माहिती दिली. विद्यार्थ्यांना आपल्या शाळांमधून तसंच डिजिलॉकरमधूनही आपली गुणपत्रिका पाहता येणार आहे. “माझे प्रिय विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल उद्या जाहीर केले जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या शुभेच्छा,” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.