देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा तामिळनाडूतील कुन्नूर येथे अपघात झाला आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याला आग लागली. या अपघातात विमानातील एकूण 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विंग कमांडर पृथ्वी सिंग हे हेलिकॉप्टर चालवत असताना अपघात झाला. मृतांचे मृतदेह इतके जळाले आहेत, त्यांची ओळख पटवणे शक्य नाही. अशा परिस्थितीत डीएनए चाचणीद्वारेच मृतदेहांची ओळख पटू शकते. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण 14 जण होते. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या संसदेत या घटनेवर निवेदन देणार आहेत. तत्पूर्वी आज ते जनरल बिपिन रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान, जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीवर शुक्रवारी दिल्ली कॅन्टमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.त्यांच्यासोबत शहीद झालेल्या अन्य 11 लष्करी अधिकाऱ्यांवर दिल्ली कॅंटमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या सर्वांचे मृतदेह गुरुवारी कुन्नूरहून दिल्लीत आणण्यात येणार आहेत