भारत पुन्हा चंद्रावर पाऊल टाकण्यासाठी सज्ज झालाय. जुलैच्या मध्यावर चंद्रयान-3 अवकाशात झेपावेल असं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोनं जाहीर केलं आहे.
चंद्रयान-3 हे भारताच्या चांद्र अभियानातलं तिसरं यान आहे. या मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा म्हणजे अलगदपणे यान उतरवण्याचा प्रयत्न केला जाईल.
याआधी केवळ रशिया, अमेरिका आणि चीन या तीनच देशांना अशी कामगिरी साधता आली होती.
चंद्रयान-3 कधी उड्डाण करेल?
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, चंद्रयान-3 आता उड्डाणासाठी सज्ज झालं असून, आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्या आहेत.
12 ते 19 जुलै 2023 दरम्यानचा काळ हा चंद्रयान-३ ची लाँच विंडो म्हणजे उड्डाणासाठी सर्वोत्तम काळ असल्याचंही एस सोमनाथ यांनी म्हटलं होतं.
त्यानुसार 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2 वाजून 30 मिनिटे हे वेळ चंद्रयान-3 च्या उड्डाणासाठी निश्चित केली आहे.
आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटरमधून हे यान अवकाशात झेपावेल.
चंद्रयानला अवकाशात घेऊन जाण्याची जबाबदारी LVM3 - M4 या रॉकेटवर असेल. (हे रॉकेट आधी GSLV Mk III म्हणूनही ओळखलं जायचं.)
रॉकेटची जुळणी काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाली असून हे रॉकेट लाँचपॅडवर नेलं जात असतानाचा व्हिडियो इस्रोनं काही दिवसांपूर्वीच शेअर केला होता.
चंद्रयान-3 चं बजेट किती आहे?
चंद्रयान-3 मोहिमेचं एकूण बजेट 615 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय.
याआधी चंद्रयान-2 साठी 917 कोटी रुपये खर्च झाले होते. मग ही मोहीम त्यापेक्षा स्वस्तात कशी होते आहे?
तर चंद्रयान-2 मध्ये ऑर्बिटर म्हणजे ग्रहाभोवती कक्षेत फिरत राहणारं यान, लँडर म्हणजे ग्रहावर खाली उतरवलं जाणारं यान आणि रोव्हर म्हणजे प्रत्यक्ष ग्रहाच्या पृष्ठभागावर संचार करणारं यान यांचा समावेश होता.
चंद्रयान-3 मध्येही लँडर आणि रोव्हर असतील, पण ऑर्बिटरऐवजी प्रपल्शन मोड्यूलचा समावेश करण्यात आला आहे. हे मोड्यूल लँडरला चंद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल आणि काही वैज्ञानिक निरीक्षणंही नोंदवेल. पण ऑर्बिटरपेक्षा याचा खर्च कमी असल्याचं सांगितलं जातंय.
चंद्रयान-3 मोहिमेची उद्दिष्टं
इस्रोच्या म्हणण्यानुसार चंद्रयान-3 मोहिमेची तीन प्रमुख उद्दिष्टं आहेत.
चंद्रावर यशस्वीरित्या अलगद उतरणं
चंद्राच्या पृष्ठभागावर संचार करण्याची रोव्हरची क्षमता दर्शवणं
वैज्ञानिक निरीक्षणं नोंदवणं
चंद्रयान-3 चे लँडर आणि रोव्हर चंद्रावर एक दिवस सूर्यप्रकाश आहे तोवर काम करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. म्हणजे पृथ्वीवरच्या 14 दिवसांएवढ्या कालावधीपर्यंत ते निरीक्षणं नोंदवत राहतील.
या मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा म्हणजे अलगदपणे यान उतरवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशात हे यान उतरवण्याची योजना आहे.
चंद्रयान-2 मोहिमेतही भारतानं यान चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न केला होता. पण विक्रम लँडर अलगद उतरण्याऐवजी चंद्रावर कोसळला होता. त्या अपयशातून धडा घेत चंद्रयान-3 मध्ये बदल करण्यात आले आहेत.
इस्रो चंद्रयान-3 मध्येही लँडरसाठी विक्रम आणि रोव्हरसाठी प्रग्यान ही नावं कायम ठेवण्याची शक्यता IANS वृत्तसंस्थेनं वर्तवली आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावरील रासायनिक आणि नैसर्गिक द्रव्यं, माती, पाण्याचे अंश यांचा अभ्यास करून चंद्राविषयीच्या आपल्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न ही मोहीम करेल.
या यानावर सेस्मोमीटर (भूकंप मोजणारं यंत्र) सारखी उपकरणंही बसवण्यात आली आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर ऊर्जा आणि वातावरणातील घटकांचा अभ्यास ही उपकरणं करतील. तसंच या मोहिमेतील काही उपकरणं चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचा अभ्यासही करतील.
चांद्रयान-3 मोहीम का महत्त्वाची?
चंद्रयान-3 फक्त भारतासाठीच नाही, तर जागतिक स्तरावरही शास्त्रज्ञांसाठी महत्त्वाची आहे.
या मोहिमेतलं लँडर यान चंद्राच्या पृष्ठभागावर अशा ठिकाणी उतरवलं जाणार आहे, जिथे आधी कुणी पोहोचलेलं नाही.
एक तर हे यान याआधीच्या चांद्र मोहिमांमध्ये मिळालेल्या ज्ञानात भर घालू शकतं. तसंच भविष्यातल्या चांद्र मोहिमांसाठी माणसाची क्षमता आणखी विकसित करू शकतं.
भारताचं चांद्र अभियान
चंद्रयान-३ ही इस्रोच्या चंद्रयान प्रोग्रॅम म्हणजेच इंडियन ल्युनर एक्सप्लोरेशन प्रोग्रॅममधली तिसरी मोहीम आहे. 2008 साली चंद्रयान-1 द्वारा तेव्हा पहिल्यांदाच भारताचा चांद्रमोहिमेवर जाणाऱ्या देशांमध्ये समावेश झाला.
चंद्रयान-1 मोहिमेत एक ऑर्बिटर म्हणजे कक्षेत फिरणारा कृत्रिम उपग्रह आणि एक इम्पॅक्टर म्हणजे चंद्रावर धडकणारं छोटं यान यांचा समावेश होता.
हे इम्पॅक्टर चंद्रावरच्या शॅकलटन विवरात धडकलं, तेव्हा भारत चंद्रावर झेंडा फडकावणारा चौथा देश बनला होता. 312 दिवसांनी ऑगस्ट 2009 मध्ये चंद्रयान-1 सोबत संपर्क तुटला, पण तोवर मोहिमेची 95 टक्के उद्दीष्ट्य सफल झाल्याचं इस्रोनं जाहीर केलं होतं.
हे संमिश्र यश भारतासाठी मात्र मोठी झेप ठरलं.
चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या रेणूंचं अस्तित्व आहे, हे शोधण्यातही चंद्रयान-1 नं महत्त्वाची भूमिका बजावली होती.
त्यानंतर दहा वर्षांनी, 22 जुलै 2019 रोजी चंद्रयान-२ अवकाशात झेपावलं.
या मोहिमेत ऑर्बिटरसोबतच विक्रम नावाचं लँडर यान चंद्रावर उतरेल आणि त्या यानातला प्रज्ञान (प्रग्यान) रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करेल अशी योजना होती.
पण 6 सप्टेंबर 2019 रोजी चंद्रावर उलगद उतरण्याच्या प्रयत्नात असतानाच विक्रम लँडर सोबत संपर्क तुटला. तीन महिन्यांनी यानाचे अवशेष सापडल्याचं नासानं जाहीर केलं.
विक्रम लँडर अपयशी ठरला, तरी ऑर्बिटर यानानं मात्र आपलं काम चोख बजावलं. त्यामुळे चंद्र आणि त्याच्या वातावरणाविषयी नवी वैज्ञानिक माहिती समोर आली.
आता चंद्रयान-3 मोहीम यशस्वी होईल अशी आशा भारतातले खगोलप्रेमी करत आहेत.
आर्टेमिस अकॉर्ड्स
सध्या चांद्र मोहिमेवर काम करणारा भारत हा एकमेव देश नाही.
अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या आर्टेमिस प्रोग्रॅमविषयी तुम्ही वाचलं असेल. या मोहिमेअंतर्गत आर्टेमिस-1 हे यान गेल्या वर्षीच चंद्राला प्रदक्षिणा घालून पृथ्वीवर परतलं होतं.
पुढच्या आर्टेमिस मोहिमांमधून 2025 सालापर्यंत माणसाला पुन्हा चंद्रावर पाठवण्याची योजना आहे.
अमेरिकेशिवाय जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि रशिया हे देशही सध्या ल्यूनर मिशन म्हणजे चांद्र मोहिमांवर काम करत आहेत.
तसंच युरोपियन युनियनमधील देश यातल्या काही मोहिमांना सहकार्य करत आहेत.
या देशांमध्ये समन्वय आणि सहकार्यासाठी आर्टेमिस अकॉर्डस या कराराची स्थापना नासा आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं केली आहे. चंद्राचा तसंच मंगळ आणि अन्य ग्रहांचा शांततापूर्ण कारणांसाठीच वापर केला जावा, हाही या कराराचा एक उद्देश आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिका भेटीवर गेले होते, तेव्हा त्यांनी या करारावर स्वाक्षरी केली आणि भारतही अधिकृतरित्या या करारात सहभागी झाला.
पण हे सगळे देश चंद्रावर एवढा खर्च का करत आहेत?
चांद्र मोहिमांवर खर्च कशासाठी?
कुणाला ही नव्या युगाची अंतराळशर्यत किंवा स्पेस रेस आहे असं वाटतं. तर कुणाच्या मते आपल्या देशातलं तंत्रज्ञान किती विकसित आहे, हे दाखवण्याची ही संधी ठरू शकते.
भारताच्या दृष्टीनं विचार केला, तर चीनसोबत स्पर्धा नाकारता येणार नाही. चीन सध्या चांग-६, चांग-7, चांग-8 या मोहिमांवर काम करत असून, चंद्रावर एका संशोधन केंद्राच्या उभारणीचे प्रयत्नही करत आहे.
पण या स्पर्धेपलीकडे जाऊन पाहिलं, तर बहुतांश चंद्रमोहिमा या भविष्यातल्या इतर अंतराळ मोहिमांची पहिली पायरी आहेत.
यातल्या अनेक मोहिमांतून जीवनावश्यक सामुग्री चंद्रावर पाठवली जाणार आहे, म्हणजे दशकभरात काही माणसं चंद्रावर राहायाला जाऊ शकतात, तिथे अभ्यास करू शकतात.
भविष्यात माणसाला मंगळावर जायचं असेल, तर त्या मोहिमेच्या तयारीसाठी हा टप्पा महत्त्वाचा असणार आहे
Published By- Priya dixit