भारताचं चंद्रयान 3 हे मिशन आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. या टप्प्यात विक्रम लँडर प्रॉडक्शन मोड्युलपासून वेगळं झालं आहे.
सध्या चंद्रयानचं अवकाश यान हे चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत पोहोचलं असून ते चंद्रासोबत गोलाकार मार्गाने फिरत आहे.
यानंतर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने हे चंद्रयान मार्गक्रमण करेल. हा बूस्टरपासून वेगळा होण्यासाठीचा पहिला टप्पा असेल.
विक्रम लँडर वेगळा झाल्यानंतरची आपल्या मार्गाने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत राहील. त्यानंतर ते येथील भूमिवर स्थिरावेल.
ISRO च्या नियोजनानुसार, पुढील सहा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन चंद्राच्या पृष्ठभागावर स्थिरावणार आहे.
विक्रम लँडर हे चंद्रापासून 30 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर वेगळा होऊन गोल कक्षेत फिरत ते चंद्रावर लँड होईल. त्यासाठी सहा दिवसांचा अर्थात 23 ऑगस्टपर्यंतचा कालावधी लागेल.
त्यानंतर 23 रोजी इस्रो विक्रम लँडरला सिग्नल पाठवण्याचं काम सुरू करेल.
विक्रम लँडर अचूकरित्या वेगळं होणं का महत्त्वाचं?
चंद्रयान 3 हे आधीच चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत पोहोचलं आहे. म्हणजेच चांद्रयान सध्या 150 किलोमीटरच्या कक्षेत फिरत आहे.
चंद्रयानचे दोन मुख्य भाग आहेत. थ्रस्टर आणि लँडिंग सेल असं त्यांना संबोधलं जातं. लँडिंग सेलमध्येच प्रज्ञान रोव्हर (वाहन) ठेवण्यात आलेलं आहे.
तर यामधील लँडरला विक्रम लँडर म्हणून ओळखलं जातं, तर वाहनाला प्रज्ञान असं संबोधण्यात येतं.
पण हे यान आहे तसं चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकत नाही. त्यासाठी हे दोन्ही भाग वेगळे होण्याची आवश्यकता असते.
चंद्राच्या कक्षेत 100 ते 30 किलोमीटर इतक्या अंतरावर हे यान आल्यानंतर वेगळे होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर लँडिंग सेल चंद्राच्या दिशेने पुढे जातं.
पृष्ठभागावरचं लँडिंग कसं असेल?
विक्रम लँडरचं चंद्रावरचं लँडिंग हेच या मोहिमेतील सर्वात मोठं आव्हान असणार आहे.
खरंतर लँडिंगची प्रक्रिया ही 15 मिनिटांचीच असते. पण आपली मोहीम यशस्वी झाली की अयशस्वी, हे या 15 मिनिटांमध्येच ठरतं.
हा टप्पा मोहिमेतील सर्वाधिक अवघड टप्पा असल्यामुळे हा महत्त्वाचा मानला जातो.
आपल्याला आठवत असेल मागच्या वेळी इस्रोने चांद्रयान 2 मोहीम राबवली होती. त्यावेळी याच टप्प्यात अखेरच्या क्षणी त्यांना अपयश आलं होतं.
यंदाचं विक्रम लँडरचं नियोजन काय?
यंदा विक्रम लँडरचं चंद्राच्या पृष्ठभागावर योग्यरित्या स्थिरावण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी काही खबरदारी घेतली आहे.
मागच्या अपयशातून धडा घेऊन त्यांनी लँडिंग सेलमध्ये काही सुधारणा केल्या आहेत.
यानुसार, लँडिंग सेलच्या खालील बाजूस चार छोटे रॉकेट बसवण्यात आलेले आहेत. लँडर चंद्रावर अलगद उतरवण्यासाठी हे रॉकेट सुरू केले जातील.
गेल्या वेळी लँडर चंद्रावर सावकाशपणे उतरू शकलं नव्हतं. पृष्ठभागावर वेगाने येऊन आदळल्यामुळेच ते फुटलं आणि ती मोहीम अयशस्वी ठरली होती.
याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा ही उपाययोजना करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त लँडिंग सेलसंदर्भातही काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे यंदा लँडिंगमध्ये कोणतीही अडचण येणार नाही, अशी अपेक्षा आहे.
शेवटच्या टप्प्यात लँडरमधून प्रज्ञान वाहन बाहेर पडणं आणि चंद्राच्या पृष्ठभागावर ते चालू लागणं असं नियोजन करण्यात आलं आहे.
त्यासाठी लँडिंग सेल चंद्राच्या पृष्ठभागावर उतरत असताना लँडरची एक बाजू हळूवार उघडली जाईल. त्यानंतर त्यातून वाहनाला खाली उतरण्यासाठी मार्ग करून दिला जाईल
यानंतर रोव्हरच्या मदतीने वाहन चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.