सुमारे २७ तासांच्या नाट्यमय घडामोडीनंतर माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली. आता पी चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणासोबतच आणखी चार प्रकरणांत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे.
पी चिदंबरम यांना सीबीआय कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची बाजू अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी चिदंबरम यांची बाजू मांडली. सीबीआयकडून पाच दिवसांची कोठडी मागण्यात येईल अशी चर्चा होती. आता सीबीआय कोर्टाने चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.
सीबीआय कोर्टाने वकील आणि चिदंबरम यांच्या नातेवाईकांना रोज ३० मिनिटं भेटण्याची संमती दिली आहे. पी चिदंबरम हे चौकशीसाठी सहकार्य करत नसल्याचा दावा सीबीआयकडून करण्यात आला होता. मात्र कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी हा दावा खोडून काढला. चिदंबरम यांना जाणीवपूर्वक या सगळ्या प्रकरणात अडकवलं जातं आहे. त्यांनी आत्तापर्यंत चौकशीला वारंवार सहकार्य केलं आहे. तरीही त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. कालपासून ते झोपलेले नाहीत, त्यांना त्रास दिला जातो आहे असं सिब्बल यांनी म्हटलं आहे.