विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये हिजाब घालण्यासाठी परवानगी देण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयात आज निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या वादावरून निर्माण झालेला तणाव लक्षात घेत बंगळुरूमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
15 ते 21 मार्च या काळात मंगलोरमध्ये मेळावे, आंदोलनं, निदर्शनं अशा सगळ्यावर बंदी घालण्यात आली आहे. तर उडुपीमधली शाळा - कॉलेजेस आज बंद राहणार आहेत.
या प्रकरणातील पुढील निर्देश येईपर्यंत विद्यार्थ्यांनी कोणताही धार्मिक पेहराव परिधान करू नये असा आदेश यापूर्वी कोर्टाने दिला होता.
या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयातल्या मुख्य न्यायाधीश रितू राज अवस्थी यांनी तीन सदस्यीय खंडपीठात एका मुस्लीम महिला न्यायाधीशांना सदस्य बनवलं आहे.
या खंडपीठाचे अध्यक्ष स्वत: मुख्य न्यायाधीश आहेत. खंडपीठाचे दुसरे सदस्य न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित आहेत. कृष्णा दीक्षित यांनी या प्रकरणी तीन दिवस युक्तिवाद ऐकल्यानंतर हे प्रकरण खंडपीठाकडे सोपवलं कारण या प्रकरणात राज्यघटनेचा कायदा आणि वैयक्तिक कायदा अशा दोन्ही गोष्टींचा संदर्भ आहे.