क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा खेळाडू जखमी झाल्याचे पाहायला मिळते. क्रिकेट हा खेळ असा आहे की दुखापतींमुळे खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र गेल्या काही वर्षांत क्रिकेटच्या मैदानावर अनेक खेळाडूंना जीव गमवावा लागला आहे. देशांतर्गत टूर्नामेंटपासून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात खेळाडू मैदानावर कोसळताना दिसले.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोएडामध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान धावा काढताना फलंदाज मैदानाच्या मध्यभागी पडला. त्याला डॉक्टरांकडे नेले असता हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. नोएडा सेक्टर 135 मध्ये झालेल्या या अपघातानंतर पेशाने इंजिनिअर असलेल्या या तरुण खेळाडूच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
सामन्यादरम्यान नॉन स्ट्रायकर म्हणून उभा असलेला 36 वर्षीय विकास हा मूळचा उत्तराखंडचा होता. तो एका कंपनीत इंजिनिअर म्हणून कामाला होता. रविवारची सुट्टी असल्याने तो नोएडा सेक्टर 135 मध्ये क्रिकेट मॅच खेळण्यासाठी गेला होता, तिथे धावत असताना मैदानाच्या मध्यभागी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुःखद घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
अलीकडील काही दिवसांत हृदयविकाराचा झटका येऊन तरुणांचा मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अभियंत्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे कारण असल्याचे घोषित केल्याचे स्टेशन प्रभारींनी सांगितले. मृतदेह घेऊन कुटुंबीय निघून गेले आहेत. पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही.